Solapur : तीर्थक्षेत्र पंढरपूर बनले समस्यांचे माहेरघर

शहरातील प्रमुख चौकातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था
Solapur Pandharpur city road damage Pits
Solapur Pandharpur city road damage Pits

पंढरपूर : शहरातील प्रमुख चौकातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली दयनीय अवस्था... तेथून वाहन गेल्यानंतर उठणारे धुळीचे लोट.. रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे दररोज होणारी वाहतूक कोंडी... प्रमुख रस्त्यांसह गल्लोगल्ली झालेले खोकी धारकांचे अतिक्रमण... विनापरवाना लावलेल्या होर्डिंगमुळे शहराचे होत असलेले विद्रूपीकरण...आदी समस्यांचे माहेरघर म्हणजेच प्रसिद्ध तिर्थक्षेत्र पंढरपूर! वर्षानुवर्षे या समस्यांवर कायमस्वरूपी उपायोजना न झाल्याने शहरातील नागरिकांसह परगावचे भाविकही त्रस्त झाले आहेत.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील भाविकांचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाची नगरी म्हणजे पंढरपूर. मागील अनेक वर्षांपासून नियोजनबद्ध विकास न झाल्यामुळे पंढरपूर शहर व आसपासचा परिसर अनेक समस्यांचे आगर बनले आहे. पंढरपूर शहराकडे येणारे सर्व प्रमुख रस्ते मागील काही वर्षात अत्यंत चांगले झाले आहेत. मात्र शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील प्रमुख चौकातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परतीच्या पावसामुळे त्या खड्ड्यांमध्ये अधिकच भर पडली आहे.

मध्यंतरी हे खड्डे बुजवण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेने चक्क मुरूमाचा वापर केला होता. त्या माती मिश्रित मुरुमामुळे एखादे जरी वाहन गेले तरी त्या परिसरात धुळीचे लोट उडत आहेत. पंढरपूर शहरातील नागरिकांसह श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक या धुळीमुळे बेजार झाले आहेत. याशिवाय शहरातील प्रमुख रस्त्यालगतच्या पदपथावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे पदपथ फक्त नावालाच उरले आहेत.

तर रस्त्याच्या कडेला बेशिस्त वाहन धारकांनी आपली वाहने अस्ताव्यस्त लावल्यामुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. पंढरपूर अर्बन बँक ते नगरपालिके समोरील रस्ता, सावरकर चौक, आंबेडकर चौक, सांगोला नाका, सरगम चौक, गजानन महाराज चौक आदी ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांसह परगावहून आलेल्या भाविकांना देखील करावा लागत आहे.

याशिवाय शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लोगल्ली असलेल्या रस्त्यांवर देखील खोकी धारकांनी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. शहरातील पदपथ म्हणजे विक्रेत्यांनी अतिक्रमण करण्याची हक्काची जागाच आहे असे वाटावे इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांनी पदपथ काबीज केले आहेत. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून वाट काढत चालावे लागत आहे.

पंढरपूर शहर व लगतच्या उपनगरांतील लोकसंख्या सुमारे दीड ते दोन लाख आहे. या लोकसंख्येच्या सोयीसाठी पंढरपूर शहरामध्ये एकही अद्यावत भाजी मंडई नाही. शहरातील ब्रिटिशकालीन इंदिरा गांधी भाजी मंडई मोडकळीस आली आहे. तर नवी पेठ परिसरात दररोज भरणारा भाजी बाजार व मंगळवारचा आठवडे बाजार चक्क रस्त्याच्या दुतर्फा भरत आहे.

याशिवाय शहरामध्ये विना परवाना होर्डिंगचे पेव फुटले आहे. शहरातील काही प्रमुख चौकामध्ये होर्डिंगची भिंत उभारली जात आहे. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. या समस्यांवर प्रशासन कायमस्वरूपी उपायोजना करणार आहे का असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com