सोलापूर : महाविकास आघाडीमुळेच रखडली समांतर जलवाहिनी

महापालिकेची स्थापना झाल्यापासून दुसऱ्यांदा भाजपला एकहाती सत्ता मिळाली.
Shrikanchanna Yannam BJP's mayor of Solapur
Shrikanchanna Yannam BJP's mayor of Solapursakal

सोलापूर: चार वर्षांपूर्वी टेंडर निघालेली ११० किलोमीटरची सोलापूर ते उजनी धरण ही समांतर जलवाहिनी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. चार वर्षांत केवळ १५-१६ किलोमीटरपर्यंतच काम पूर्ण झाले असून, सगळे काम संपायला तब्बल तीन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे नियमित पाणीपुरवठ्याचे आश्‍वासन सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आले नाही. त्याचे खापर आता महापौर श्रीकांचना यन्नम यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडले आहे.

महापालिकेची स्थापना झाल्यापासून दुसऱ्यांदा भाजपला एकहाती सत्ता मिळाली. पाच वर्षांत ना उत्पन्न वाढले ना, शहराचा विकास झाला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. सध्या महापालिकेची तिजोरी रिकामी असून बाहेरील देणे १०० कोटींपर्यंत आहे. दुसरीकडे हद्दवाढ भागातील सर्व नागरिकांना ना ड्रेनेज ना नियमित पाणी मिळाले. शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यांवरील खड्डेदेखील सत्ताधाऱ्यांना बुजविता आलेले नाहीत, असेही विरोधकांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकीवेळी विरोधक याच मुद्‌द्‌यावर प्रचार करतील, हे निश्‍चित आहे. मात्र, समांतर जलवाहिनी पूर्ण करून नागरिकांना नियमित

पाणी देण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला, निविदा काढली, कामही सुरू झाले. परंतु, कोरोना आणि महाविकास आघाडीकडून निधी मिळाला नाही. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जागा मिळविली आणि भूसंपादनाचा प्रश्‍न मिटविला. त्यामुळे समांतर जलवाहिनीला आडकाठी आणली कुणी, याची वस्तूस्थिती आम्ही जनतेसमोर मांडू, असे सत्ताधारी भाजपने म्हटले आहे.

भाजपची सत्ता असताना राज्य सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. पण, राज्यातील सत्ता बदलल्यानंतर विकासकामांच्या निधीसाठी संघर्ष करावा लागला. समांतर जलवाहिनीसाठी वेळोवेळी निधीची मागणी करूनही महाविकास आघाडी सरकारकडून तो मिळाला नाही. त्यामुळेच समांतर जलवाहिनीचे काम रखडले.

- श्रीकांचना यन्नम, महापौर

समांतर जलवाहिनीचा प्रवास

सुरवातीला ४५० कोटींचे बजेट, आता ८०० कोटी लागणार

समांतर जलवाहिनीबद्दल २०१७ मध्ये झाली होती चर्चा

२०१८ मध्ये जलवाहिनीच्या कामाची निघाली निविदा

कंत्राटदार नियुक्‍त करून त्याला २०१९ मध्ये दिली वर्क ऑर्डर

९ सप्टेंबर २०२० रोजी जलवाहिनीच्या कामाला सुरवात झाली

मक्‍तेदार बदलून आता मार्च २०२२ अखेर नव्याने निघणार नवीन टेंडर

आतापर्यंत १६ किलोमीटरपर्यंत काम पूर्ण, उर्वरित कामासाठी लागणार ३ वर्षे

पूर्वी महापालिकेला ५० कोटींचा हिस्सा द्यावा लागत होता, आता १०० कोटी द्यावे लागतील

निवडणुकीमुळे सरकारची निधी देण्याची तयारी

समांतर जलवाहिनीसाठी भूसंपादन करावे लागणार होते, त्यावेळी राज्य सरकारकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवून त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. पण, महाविकास आघाडी सरकारने पैसे देण्यास नकार दिला. आता महापालिका निवडणूक होणार असल्याने वाढीव निधी देण्याचे मान्य केले आहे, असा आरोपही महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केला. महाविकास आघाडी सरकारमुळेच समांतर जलवाहिनीसाठी विलंब लागला, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, सत्ताधारी भाजपचा उद्या (सोमवारी) पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होणार असून निवडणूक होईपर्यंत आयुक्‍त पी. शिवशंकर हे प्रशासक म्हणून कारभार सांभाळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com