Solapur News : सोलापुरातील पेठांचा इतिहास मोठा रंजक; १८५३ पर्यंत २६ पेठांचा उल्लेख विविध संदर्भ ग्रंथात

मुळच्या काही पेठांचे इतर पेठांमध्ये विलीनीकरण; साधारणपणे कसबा व शुक्रवार या अत्यंत जुन्या पेठा होत्या.
सोलापुरातील पेठांचा इतिहास मोठा रंजक
सोलापुरातील पेठांचा इतिहास मोठा रंजकSakal
Updated on

Solapur News : पूर्वीच्या सोलापूरमध्ये २६ पेठा असल्याचे उल्लेख अनेक संदर्भ ग्रंथांमध्ये आहेत. यातील काही पेठा अन्य पेठांमध्ये विलीन झाल्या तर त्यातील काही पेठांची नावेही खूप विलक्षण होती. १८५३ पर्यंत विविध संदर्भ ग्रंथामध्ये पेठांचा उल्लेख आढळतो. सोलापुरातील पेठांचा इतिहास मोठा रंजक आहे.

साधारणपणे कसबा व शुक्रवार या अत्यंत जुन्या पेठा होत्या. ज्या साली नगरपालिका स्थापन झाली त्या साली कसबा, शुक्रवार व मंगळवार पेठ या जुन्या पेठा, शिवाय शनिवार पेठ, बेगम पेठ, साखर, गणेश, सिद्धेश्वर, बुधवार म्हणजे (बाबू), सोमवार, पाच्छा, धाकटा व थोरला राजवाडा (पूर्वीचा महार वाडा) यांचा उल्लेख कागदपत्रांतून आढळतो.

या पेठांमधून वस्ती अत्यंत विरळ होती. परंतु पुढे टी. पी. स्कीम्समुळे ज्या सुखसोई मिळत गेल्या त्यामुळे या भागातील लोकवस्तीही वाढत गेली. जुन्या कागदपत्रांवरून असे आढळून येते की, बेगम पेठेला पूर्वी "बेगम पुरा " असे संबोधण्यात येई.

१८५३ पूर्वी ५० वर्षे म्हणजे सुमारे १८०० ते १८०३ च्या सुमारास शुक्रवार पेठ, कसबा पेठ, शनिवार पेठ, बेगमपूर व गुरुजी पेठ या मुख्य पेठा होत्या. गणेश पेठ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागांत जे गणपतीचे मंदिर आहे, त्यावरून त्या पेठेचे नाव गणेश पेठ असे पडले असावे.

साखर पेठ व सिद्धेश्वर पेठ या दोन पेठांमधून नंतर वस्ती वाढली. साखर पेठेतील लोकवस्ती साधारण खंडोबाच्या तलावापर्यंतच होती असे १८८१ च्या शहराच्या नकाशावरून दिसते. १८८१ साली सिद्धेश्वर पेठेचा उल्लेख जरी आढळत असला, तरीही त्या भागात अगदीच तुरळक वस्ती असून बेगम पेठ ही विजापूर वेशीपासून जेलपर्यंतच होती.

जेलच्यामागे (दक्षिण भागास) वस्ती अजिबात नव्हती. तीच स्थिती पाच्छा पेठेची होती. सिव्हिल हॉस्पिटलच्या दक्षिण भागाच्या आसपास थोडीबहुत वस्ती होती. आज पाच्छापेठेत वस्ती वाढली आहे. त्यावेळी जेल आणि सिव्हिल हॉस्पिटल हे एकमेकांजवळ होते.

मंगळवार पेठेची वस्ती पश्चिमेकडे बाळीवेशीपर्यंत व उत्तरेकडे तुळजापूर वेशी- पर्यंत एवढीच होती. बाळी वेशीपासून नव्या वेशीपर्यंत येणाऱ्या रस्त्याच्या पलिकडे थोरल्या राजवाड्याशिवाय वस्ती नव्हती.

किल्ल्याच्या नैऋत्य व पश्चिम दिशेस म्हणजे नवीवेस ते स्टेशन व नवीवेस ते सध्याचे डफरीन हॉस्पिटल या रस्त्यामधील भाग (मुरारजी पेठ, रेल्वे लाइन्स व एके काळची किल्ला पेठ होती. सिद्धेश्वर तलावाच्या दक्षिणेकडील भागात वस्ती नव्हती.

डफरिन हॉस्पिटलच्या जागी त्यावेळी मामलेदार कचेरी होती. कलेक्टर ऑफिस, कलेक्टर बंगला, मामलेदार कचेरी (डफरीन हॉ.) यांच्या आसपासचा सर्व भाग म्हणजे हल्लीचे सदर बझार, रेल्वे लाईन, मुरारजी पेठ व सिद्धेश्वर पेठेचा बहुतेक भाग यामधून तुरळक वस्ती होती. कॅम्प, मोदीखाना व फारसे विभाग हेही असेच तुरळक वस्तीचे भाग होते.

राणी पेठ, मिल पेठ, बाबू पेठ, शंकर पेठ, मरगम पट्टी, रेवणी पेठ आदि पेठा सध्या अस्तित्वात नाहीत, त्या सध्याच्या निरनिराळ्या पेठांमधून विलीन झाल्या असाव्यात.

- सुनीलकुमार व्हसाळे, निवृत्त उपमुख्याध्यापक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com