Solapur : मानधनासाठी पोलिस पाटलांचाच तंटा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

Solapur : मानधनासाठी पोलिस पाटलांचाच तंटा!

सोलापूर : गावातील तंटे गावातच मिटावेत, वादावादी होऊ नये, पोलिसांवरील ताण कमी व्हावा, या हेतूने काम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ८४३ पोलिस पाटलांसह राज्यातील २८ हजार पोलिस पाटलांना दोन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यांना तीन-साडेतीन वर्षांचा प्रवास भत्तादेखील मिळालेला नाही.

जिल्ह्यातील बाराशे गावांमधील शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी पोलिस पाटलांची नेमणूक करण्यात आली आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ केली होती. त्यांना दरमहा साडेसहा हजार रुपयांचे मानधन मिळते. दुसरीकडे, गावातून पोलिस ठाणे किंवा पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत जाण्यासाठी त्यांना ५० ते १०० रुपयांपर्यंत प्रवास भत्ता मिळतो. महिन्यातून पाचवेळा हा प्रवास भत्ता दिला जातो.

तीन-चार वर्षांपासून पोलिस पाटलांना प्रवासासाठी परदमोड करावी लागत आहे. राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली आहेत. अशावेळी पोलिसांना गुन्ह्यांच्या तपास कामात मोलाची मदत करणाऱ्या पोलिस पाटलांना दरमहा मानधन मिळावे, एवढीच अपेक्षा आहे. पण, निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून त्यांना दरमहा मानधन दिले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून मानधनाचे प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाला सादर करूनही दोन महिन्यांचे मानधन त्यांना मिळू शकले नाही.

राज्यातील सत्तांतरानंतरच्या वादात पोलिस पाटलांच्या मानधनाकडे दुर्लक्ष झाल्याची स्थिती आहे. मानधन वाढीचा विषय प्रलंबितच असून, आता वेळेत मानधन मिळत नसल्याची नाराजी पोलिस पाटलांमध्ये आहे.

कोरोना काळात संसर्ग वाढणार नाही, यादृष्टीने पोलिस पाटलांनी खूप काम केले. गावातील अवैध व्यवसाय, अवैध धंद्यांवरील नियंत्रण व तंटे मिटविण्याचे देखील काम पोलिस पाटील करतात. दोन महिने होऊन गेले, तरीदेखील पोलिस पाटलांना मानधन मिळालेले नाही. प्रवास भत्ताही प्रलंबित आहे.

- दिलीप पाटील, जिल्हाध्यक्ष, पोलिस पाटील संघटना, सोलापूर

टॅग्स :Solapur