Solapur Protest : तालुका स्तरावरील सेतू कार्यालये सुरू करा, नागरिकांचे ठिय्या आंदोलन Solapur Protest Student college | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Protest

Solapur Protest : तालुका स्तरावरील सेतू कार्यालये सुरू करा, नागरिकांचे ठिय्या आंदोलन

Solapur Protest - मोहोळ सह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील सेतू कार्यालय बंद आहेत, त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.जुन पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. दहावी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी वेगवेगळ्या स्वरूपांच्या दाखले मिळविण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे.

महा-ई-सेवा केंद्रात मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट होत आहे, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी सेतू कार्यालये त्वरित सुरू करावी या मागणीसाठी प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शना खाली सोमवार ता 5 रोजी ज्योती क्रांती परिषद विद्यार्थी आघाडी मोहोळ तालुक्याच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालया समोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार लक्षात घेऊन मोहोळ सह सोलापूर जिल्ह्यातील सर्व सेतू कार्यालये त्वरित सुरू करावी.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या विद्यार्थ्यांना विविध दाखले घेण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रातुन मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

हातावरचं पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी मोठी अडचण आहे. आज संविधानिक मार्गाने या ठिकाणी ठिय्या आंदोलन करीत आहोत. जर या मागणीचा गांभीर्य पूर्वक विचार करून शासनाने सेतू कार्यालय त्वरित सुरू केली नाहीत तर या पुढील काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दरम्यान देण्यात आला.

या आंदोलनाच्या वेळी ज्योती क्रांती परिषद विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ एकमल्ले,शहराध्यक्ष संग्राम गरड,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सुरज जाधव,ज्योती क्रांती परिषदेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संगीता पवार,दिलवर मुजावर आदींसह विद्यार्थी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहोळ तहसील कार्यालया समोर ज्योती क्रांती परिषद विद्यार्थी आघाडीच्या वतीने एक दिवशी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :SolapurProtest