सोलापूर : नऊ स्थानकांच्या नावांसह आता झळकणार ‘ब्रँड’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

सोलापूर : नऊ स्थानकांच्या नावांसह आता झळकणार ‘ब्रँड’!

सोलापूर: रेल्वे स्थानकाच्या नावापुढे आता एखादा ब्रँड किंवा कंपनीचे नाव झळकणार आहे. मध्य रेल्वेने इतर उत्पन्न (नॉन फेअर रेव्हेन्यू) प्राप्त करण्याच्या उद्देशाने रेल्वे स्थानकांचे ‘को-ब्रँडिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर विभागातील नऊ स्थानकांची यात निवड करण्यात आली असून, त्यासाठी इच्छुकांकडून ‘स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव’ (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविण्यात आले आहेत.

रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशभरातील रेल्वे स्थानकांचे ‘को-ब्रँडिंग’ केले जात आहे. याचे काम मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये सुरू झाले आहे. को-ब्रँडिंग म्हणजे स्टेशनच्या नावासोबत ब्रँडचे नाव जोडले जाईल. ‘नॉन-फेअर रेव्हेन्यू’ वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश असणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या वेबसाइटवर यासंबंधीची सर्व कागदपत्रे आदी माहिती उपलब्ध असणार आहे, तर यानंतर २१ दिवसांच्या आत निविदा स्वीकारल्या जाणार असून, त्यानंतर त्याची तपासणी होऊन को-ब्रँडिंगचे अधिकार दिले जाणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोलापूर विभागामध्ये को-ब्रँडिंगसाठी प्रस्तावित स्थानके सोलापूर, वाडी, कलबुर्गी, लातूर, पंढरपूर, दौंड, अहमदनगर, कोपरगाव आणि साईनगर शिर्डी यांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागातील सोलापूरसह नऊ रेल्वे स्थानकांची को-ब्रॅंडिंग करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. को-ब्रॅंडिंगमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

- प्रदीप हिरडे,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर