
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील 91 स्वस्त धान्य दुकांनाना ISO मानांकन
मोहोळ : मोहोळ तालुक्यात तील 91 सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, दुकाना बरोबरच संपूर्ण पुरवठा शाखा व धान्य साठवणुकीचे गोदामही आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारल्या नंतर गेल्या तीन महिन्यापासून पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, स्वस्त धान्य दुकाने व धान्य साठवणुकीची गोदामे यांची तपासणी केली. त्यात त्यांना अत्यंत अस्वच्छता आढळून आली धान्याला लागलेली जाळी, किडे, तसेच दुकानातील अस्वच्छता हे चित्र पाहिल्यावर त्यांनी सर्व दुकाने, गोदामे व तहसील कार्यालये आयएसओ करण्याची मनाशी खूणगाठ बांधली. तातडीने त्यांनी आदेश काढून जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार व पुरवठा शाखेतील कर्मचारी यांना याबाबत माहिती दिली व तयारीला लागण्यास सांगितले.
स्वस्त धान्य दुकान म्हणले की प्रत्येकाच्या मनात तिरस्कार, भ्रष्टाचाराचा अड्डा, घाण, काळाबाजार, उंदराचा सुळसुळाट असे चित्र उभे राहते. ग्रामीण भागासह शहरातील शेवटच्या घटकातील नागरिक उपाशी राहू नये हा स्वस्त धान्य दुकानाचा उद्देश आहे.हे चित्र बदलण्यासाठी उपायुक्त कुलकर्णी यांनी कंबर कसली. त्याला दुकानदार व अधिकाऱ्यांकडून ही चांगला प्रतिसाद मिळाला. मोहोळ तालुका ही त्याला अपवाद नाही. दुकानदारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून स्वतंत्र फाईल तयार करून पुरवठा उपायुक्त कार्यालयाकडे पाठवल्या होत्या. दुकाने आयएसओ झाल्यामुळे दुकानात येणारा ग्राहकही समाधानाने माल घेऊन जात असल्याचे चित्र आहे. दुकाने आयएओ करण्यासाठी व दुकानदारांना मार्गदर्शन करण्यासाठी पुरवठा अव्वल कारकून शैलजा बिज्जरगी, पुरवठा निरीक्षक महालिंग लोंढे, वरिष्ठ लिपिक वनिता सुरवसे, संगणक तज्ञ अमोल कुंभार, गौतम गाडे, सुरज पाटील यांनी परिश्रम घेतले.
स्वस्त धान्य दुकानात या मिळणार सुविधा
शॉप ॲक्ट परवाना
स्मोक डिटेक्टर
सीसीटीव्ही कॅमेरे
उंदराचा पिंजरा
पेस्ट कंट्रोल
पिण्याचे स्वच्छ पाणी
ऑनलाइन पेमेंट ची सोय
ड्रेस कोड
जीपीएस मॅपिंग
प्रथमोपचार पेटी
बसण्याची व्यवस्था
Web Title: Solapur Ration Shop Iso
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..