Solapur : समाजवेदना संपविण्यासाठी करिअर पणाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

Solapur : समाजवेदना संपविण्यासाठी करिअर पणाला

सोलापूर : स्वातंत्र्यसेनानीची नात म्हणून सामाजिक संवेदनाचा मिळालेला वारसा कौटुंबिक न्यायालयाच्या कार्यातून चालवताना आदर्शाच्या वाटेवर जगण्यात रमून गेले. तुटणारे संसार जोडल्याच्या भावनेत आनंदाचा शोध लागला, अशी भावना कौटुंबिक न्यायालयाच्या ज्येष्ठ विधिज्ञ रत्ना अंत्रोळीकर-शहा यांनी व्यक्त केली. विधी सेवेच्या माध्यमातून काम करणाऱ्या ॲड. रत्ना अंत्रोळीकर-शहा यांनी त्यांच्या करिअरचा प्रवास उलगडला.

त्या म्हणाल्या, मी हरिभाई देवकरण प्रशालेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुढे डी. ए. व्ही. लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात कायद्यातील वेगवेगळ्या विषयांत विद्यापीठातर्फे सलग तीन वर्षे शैक्षणिक पुरस्कार मिळविले. आई-वडिलांचे चांगले संस्कार, कुटुंबात असलेले शिक्षण व वाचनाचे वातावरण आणि मुबलक स्वातंत्र्यामुळे कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. २००१ मध्ये वकिलीला सुरवात केल्यानंतर ‘मानवी हक्क’ विषयामधून एलएल.एम. पदवी घेतली.

प्रत्येक कुटुंब मजबूत बनून उभे राहिले तरच समाज खऱ्या अर्थाने पुढे जाईल, ही भावना कामात रुजविली. आदर्शाला भावनेचे स्वरूप न देता ते डोळस कृतीतून मांडले तर कौटुंबिक संघर्षाचे प्रश्न सुटू शकतात, हे संतुलन मला सामाजिक आदर्शामुळे लाभले. शेवटी कुटुंब हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखी राहण्याचा ठेवा जपायला हवा. अन्यथा, शेवटचा पर्याय कायदा असावा, हे मी या कामातून मांडत राहिले. अर्थातच माझे पती, सासू-सासरे व आई-वडील यांचे पाठबळ या कार्यासाठी राहिले.

काम व संगीताने हेल्थ स्थिर

संवेदनशील मनाने खटल्याचा निकाल मिळवण्याच्या हेतूने केलेल्या कामामुळे आरोग्य स्थिर राहिले. कधी फारसे आजारी पडले नाही. संगीत ऐकण्याच्या छंदामुळे आजारासाठी लागणारे निराशा, चिंता हे कारण संपवले, असेच म्हणावे लागेल.

ठळक बाबी...

रामलाल चौक येथील चाळीतील गरजू विद्यार्थ्यांचे मोफत शैक्षणिक वर्ग घेतले

२००१ मध्ये वकिली व्यवसायास प्रारंभ

केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस प्रशिक्षणार्थींना कायद्याचे ज्ञान दिले

सलग नऊ वर्षे कायदा प्रशिक्षक म्हणून नोकरी

‘सकाळ-तनिष्का’च्या माध्यमातून मोफत कौटुंबिक सल्ला केंद्र

जिल्हा व कौटुंबिक न्यायालयात काम करताना किरकोळ कारणांवरून उद्‌ध्वस्त होणारी कुटुंबे जवळून पाहिली. त्याला कोठेतरी आळा बसावा म्हणून देशभक्त कृ. भि. अंत्रोळीकर ट्रस्ट व ‘सकाळ - तनिष्का स्त्री प्रतिष्ठा’ अभियानाच्या माध्यमातून मोफत कौटुंबिक सल्ला केंद्र सुरू केले. या केंद्राचे कामकाज जाणून घेण्यासाठी मेक्सिकोच्या ऑटोन गार्सिया व पौठा एक्सलांते यांनी भेट दिली.

आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी

आई-वडिलांनी दिलेल्या चांगल्या संस्काराची शिदोरी मला कायम जपता आली. एक व्यक्ती म्हणून कुटुंबाने दिलेल्या स्वातंत्र्याचा माझ्या शिक्षणासाठी उपयोग झाला. याच संस्काराने मला सामाजिक क्षेत्रात अधिक चांगली कामगिरी करता आली.

वाचन व ट्रेकिंग

वाचनामुळे लिहिती झाले. त्यानंतर ट्रेकिंगचा छंद लागला. सिमला, कुलू-मनाली, सारपास चंद्रखाणी भागात यूथ हॉस्टेलच्यावतीने ट्रेकिंग करता आले. याशिवाय स्वयंपाकाच्या अनेक गोष्टी शिकून नवीन पदार्थ खाऊ घालण्यामध्ये मी माझा आनंद शोधला. शालेय मैत्रिणींसोबत नेहमी बोलती राहिल्याने मन प्रवाहित करता आले.

टॅग्स :Solapurindian army