
सोलापूर : गोमूत्र, शेणखताद्वारे कांद्याचे विक्रमी उत्पादन
सोलापूर : माढा तालुक्यातील ढवळस येथील शहाजी पाटील यांनी शेतीत खत व फवारणीसाठी केवळ गो-उत्पादनांचा वापर करून अन्य रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत चांगले उत्पादन मिळवले.
शहाजी पाटील यांची सहा एकराची शेती आहे. मागील वर्षीपासून त्यांनी त्यांची शेती सेंद्रिय करण्यासाठी काम सुरू केले. रासायनिक खतांचा खर्च खूप व त्या तुलनेत उत्पन्न मिळेल याची खात्री नसते. तर रासायनिक खतांचा खर्च करायचा नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी एक गाय सुरवातीला विकत घेऊन काम सुरू केले.
गोमूत्र व गाईच्या शेणाचा वापर त्यांनी सुरू केला. एकरभरात त्यांनी गाईचे शेण आधी पसरवले. नंतर त्यांनी कांद्याची लागवड केली. कांद्याला त्यांनी पाण्यातून गोमूत्र दिले. तसेच फवारणीसाठी देखील गोमूत्राचा वापर केला. गाईच्या उत्पादनांपासून तयार केलेली लिक्विड खते त्यांनी कांद्याला दिली. घरच्या घरी त्यांनी फवारणी व खते गोमूत्र, शेण व ताकापासून तयार केली. त्यांना एकरी २० टन कांद्याचा उतारा मिळाला. तर इतर शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीद्वारे कांदा पिकवला, त्यांचा उतारा मात्र कमी राहिला.
त्यांनी नंतर उसाच्या लागवडीत देखील सुरवातीला युरियाऐवजी शेणखत व गोमूत्राचा वापर केला. त्यामुळे त्यांच्या शेतातील गांडुळांची संख्या वाढती राहिल्याने जमीन अधिक सुपीक झाली. त्याचा लाभ त्यांच्या ऊस उत्पादनाला देखील झाला आहे. गायीसाठी आधी वैरण लागवड करून गाई वाढवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
अगदी सुरवातीलाच गोपालनाने सेंद्रिय शेती करता आली. त्यासोबत कांद्याचे पीक चांगले निघाले. सेंद्रिय असल्याने भाव देखील जास्त मिळाला आहे. आता गाईंची संख्या वाढवण्याचे ठरवले आहे.
- शहाजी संदीपान पाटील, ढवळस, ता. माढा
Web Title: Solapur Record Production Cow Urine Cow Dung
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..