Solapur : सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराच्या मुलीची 'आयएएस’ला गवसणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SOLAPUR IAS NEWS

Solapur : सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराच्या मुलीची 'IAS’ला गवसणी

उपळाई बुद्रूक : आयुष्यात कधीही, कुठेही व केव्हाही योग्य निर्णय घेण्याची कला व घेतलेला निर्णय पूर्ण करण्याची जिद्द अंगी असल्यास तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही, हे सिद्ध केलंय उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील एका सेवानिवृत्त फौजदाराच्या मुलीने. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशासनात काम करण्याचा ऐनवेळी घेतलेला निर्णय, दोन ते तीन वर्षे सलग अपयश येऊनही ते पचवत जिद्दीच्या जोरावर यूपीएससीतून आयएएसपदाचे यशोशिखर गाठले आहे. डॉ. अश्विनी तानाजी वाकडे असे त्यांचे नाव असून, त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा...

आयएएस अश्विनी वाकडे त्यांच्या यशाबद्दल सांगतात की, अधिकाऱ्यांचे गाव म्हणून नावलौकिक असलेल्या उपळाई बुद्रूक येथील माळरानावर वसलेली आमची वस्ती म्हणजे धनगरवाडी. एक तर चांगली शेती अथवा चांगली नोकरी करणे हेच आमच्या वस्तीवरील लोकांचे उद्दिष्ट. तसे प्रयत्न करून आज प्रत्येकजण आपापले ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करताहेत. अनेकजण नोकरीला आहेत. त्यापैकी माझे वडील तानाजी वाकडे हे देखील पोलिस खात्यात होते. तर आई गृहिणी. वडील घेरडी (ता.सांगोला) येथे कार्यरत असल्याने प्राथमिक शिक्षण तेथीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. वडील नोकरी करत जरी असले तरी आमच्या शिक्षणाकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असायचे.

आपल्या मुलांना शिक्षणात काही कमी पडू नये, तसेच मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. तसेच नेहमी प्रेरणादायी यशोगाथा सांगत. प्रशासनातील अधिकारी पदांचे महत्त्व अधोरेखित करून देत असत. त्यामुळे आम्हा भावंडांना शिक्षणाची प्रेरणा वडिलांकडून मिळाली. शाळेत हुशार असल्याने, गुणवत्तेच्या जोरावर पाचवी ते दहावीच्या शिक्षणासाठी पोखरापूर (ता. मोहोळ) येथील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला. मोठा भाऊ व बहीण यांचे मार्गदर्शन व वडिलांची प्रेरणा यामुळे शिक्षणातील घोडदौड सुरू होती. अभ्यासाबरोबर इतर गोष्टींनाही तितकेच महत्त्व दिले होते. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा असो की इतर स्पर्धा परीक्षा, त्यात आवर्जून सहभाग असायचा. टेबल टेनिस या खेळाची आवड असल्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेतून राज्यपातळीवर खेळण्याची संधी मिळाली.

या सर्व आवडीनिवडी जोपासत दहावीत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले. त्यामुळे कुटुंबीयांच्या अपेक्षा वाढल्या. बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयातून अकरावी, बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलांच्या इच्छेनुसार मी डॉक्टर व्हावे यासाठी मेडिकलला जाण्यासाठी असलेली परीक्षा दिली अन् त्यात पहिल्या प्रयत्नातच ‘एमबीबीएस’ला पुणे येथे प्रवेश मिळाला. या काळात मोठा भाऊ अमरदीप व बहीण मीनाक्षी दोघेही एमपीएससीचा अभ्यास करत होते. मेडिकल क्षेत्रात राहून ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळत असल्याने, मी निवडलेल्या क्षेत्रात रमले होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेबद्दल कसलेही आकर्षण नव्हते.

‘एमबीबीएस’चे शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण झाले. तोपर्यंत या काळातच बहिणीची एमपीएससीमार्फत वित्त व लेखा अधिकारी तर मोठ्या भावाची तहसीलदार म्हणून निवड झाली. ही माझ्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट होती. आईवडिलांनी केलेल्या संस्कारामुळे व मार्गदर्शनामुळे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही प्रयत्न करत गेलो अन् यशस्वी झालो होतो.

वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले होते. मेडिकलचे शिक्षण पूर्ण होताच पुणे ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. ग्रामीण भागातील समस्या जवळून पाहता आल्या. हे कुठेतरी बदलायला हवे, असे मनोमन वाटू लागले. त्यामुळे प्रशासनात जाऊन आपण देखील या समस्यांचे निराकरण करू शकतो, या भावनेतून तसेच भाऊ व बहिणीच्या प्रेरणेने स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. वडिलांना याबाबत कल्पना दिली. त्यामुळे त्यांनी होकार देत एमपीएससी न करता यूपीएससी करण्याचा सल्ला दिला व आपल्या भाऊ व बहिणीपेक्षा मोठ्या पदावर विराजमान व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाऊ अमरदीप यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. हातात मेडिकलची पदवी असल्याने, या काळात अनेकजण कुठेतरी नोकरी करून आयुष्याची पुढील रणनीती आखतात. त्यावेळी मी नव्याने यूपीएससीकडे वळले होते. प्रत्येक गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. तरीदेखील अभ्यास सुरू केला. पहिले दोन ते तीन वर्षे काही चुका होत गेल्या अन् अपयश येत गेले. परंतु स्वतःवर पूर्णपणे विश्वास असल्याने, प्रयत्न सुरू होते. या काळात कुटुंबीयांची पूर्ण साथ होती.

तू यशस्वी होऊ शकतेस, असा त्यांचा एक आत्मविश्वास कायमस्वरूपी प्रोत्साहन देणारा असायचा. त्यामुळे अखेर २०१९ साली घेण्यात आलेल्या यूपीएससीच्या परीक्षेत सातत्य, कष्ट करण्याच्या क्षमतेमुळे संयम, जिद्दीने परीक्षेस सामोरे गेले अन् २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये आयएएसपदी निवड झाली. एका सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराची मुलगी आयएएस झाल्याने सर्वत्र कौतुक झाले. सध्या हैदराबाद येथे कार्यरत आहे.