
सोलापूर : सकाळी दहा ते सव्वापाचपर्यंत शाळांची वेळ
सोलापूर : यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळांची पहिली घंटा उद्या (बुधवारी) वाजणार आहे. पहिल्या दिवशी मुलांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे. पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. शाळांची वेळ सकाळी दहा ते सव्वापाच वाजेपर्यंत असणार आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर पहिल्यांदाच शाळा वेळेवर सुरू होत आहेत. इयत्ता पहिलीतील विद्यार्थी पहिल्यांदाच शाळेत येत आहेत. त्या मुलांच्या मनातील शाळेविषयीची भीती दूर करण्याचे आणि अभ्यासात पिछाडीवर असलेल्या मुलांची गुणवत्ता सुधारण्याचे मोठे आव्हान शिक्षकांना पेलावे लागणार आहे. शाळेचा उद्या (बुधवारी) पहिला दिवस असल्याने मंगळवारी (ता. १४) सर्व शाळांनी प्रवेशद्वारावर रांगोळी काढून फुगे लावले आहेत. शाळेत येताना मुलांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
शाळांची वेळ पूर्वीप्रमाणेच असणार आहे. दोन वर्षे घरी बसून ऑनलाइन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वातावरणात रुळवून त्यांची उपस्थिती शाळांना टिकवावी लागणार आहे. मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. दुसरीकडे, काही शहरांमध्ये कोरोना वाढत असल्याने त्याबद्दलही खबरदारी घ्यावी लागेल. दरम्यान, यंदा पालकांनी स्वत:हून विद्यार्थ्यांना मराठी किंवा सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश घेतला आहे. पावसाची परिस्थिती पाहून शाळांनी दूरवरील मुलांना लवकर घरी पाठवावे, अशा सूचनाही प्रशासनाने शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
शाळांचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. सर्व शाळांची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत असणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन सर्व शाळा भरतील.
- किरण लोहार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
शाळांनी अशी घ्यावी खबरदारी...
विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी
दोन मुलांमध्ये किमान पाच फुटांचे अंतर ठेवावे
१२ वर्षांवरील मुलांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली की नाही हे पाहावे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या आरोग्याला द्यावे प्राधान्य
सर्दी, खोकला असलेल्या मुलांकडे अधिक लक्ष द्यावे
पालकांनी अशी घ्यावी विद्यार्थ्यांची काळजी
शाळेत पाठविताना मुलांसोबत पाण्याची बाटली द्यावी
मुलांना शाळेत जाताना पालकांनी मास्क द्यावा
पालकांनी मुलांसोबत द्यावा जेवणाचा डबा
शाळेतून घरी आल्यानंतर मुलांचे कपडे व हातपाय स्वच्छ धुवावेत
आजारी असल्यास मुलाला शाळेत पाठवू नये
Web Title: Solapur School Hours 10 Am To 5 Pm
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..