Solapur : अनोळखी 'हाय हॅलो' ला प्रतिसाद देताय जरा जपूनच.

सेक्सटॉर्शन चा विळखा ग्रामीण भागात पसरला; अनेकांच्या व्हाट्सअपला येतात मेसेज
 Call
Call e sakal

सोलापूर : हाय, हॅलो, मला तुमच्याशी बोलायचं आहे. असा मेसेज तुमच्या व्हाट्सअप वर सुंदर मुलीचा प्रोफाइल फोटो असलेल्या अनोळखी नंबरवरून आला असेल तर सावधान तुम्ही नकळतपणे सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकले तर जात नाही याची खबरदारी घ्या. कारण हाय प्रोफाईल, राजकीय, उच्च अधिकारी यांच्यावर होणारे सेक्सटॉर्शनचे लोन आता ग्रामीण भागात देखील पसरल्याचे दिसुन येत आहे.

सेक्स टॉर्शनचा प्रकार गेल्या दोन ते तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मोठमोठ्या लोकांना याचा फटका बसला आहे. या प्रकरणात बदनामी होण्याच्या भीतीचे कित्येकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. सध्या या सेक्स टॉर्शनचे जाळे सोशल मिडियाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. अनेकांच्या थेट व्हाट्सअपवर अचानकपणे सुंदर मुलीचा प्रोफाइल फोटो असलेल्या अनोळखी क्रमांकावरून मेसेज येतो. त्याला प्रतिसाद दिला की, गोड बोलून त्याच्याकडून अधिक माहिती काढून घेतली जाते. वारंवार संवाद साधल्यानंतर अश्लील संवाद सुरू होतो. संवाद सुरू झाल्यानंतर शारीरिक संदर्भातील व्हिडिओ संवाद सुरू होतो. आणि याचाच फायदा घेऊन स्क्रीन रेकॉर्ड केलं जातं.

इथून खेळ सुरू होतो पैसे देवाण-घेवाणीचा. जर मला अमुक-तमुक रक्कम नाही दिली तर मी तुझे हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करुन बदनामी करण्याची धमकी दिली जाते. अन् मग सुरुवात होते मानसिक छळ, खंडणीची मागणी आणि ब्लॅकमेलिंगची. यातून पुढे गंभीर गुन्हेही घडत जातात. या ट्रॅपची मोठ्या प्रमाणात सुरुवात व्हॉट्सअपवर होताना दिसत आहे.

तरुण या मोहजाळ्यात अडकून बदनामी वाचवण्यासाठी पैसे देतात. जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर तरुण आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय निवडत नाहीत. त्यामुळे सोशल मिडिया वापरकर्त्यांना या धोक्याची पूर्वकल्पना असणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत असुन, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी बोलताना कोणत्याही मोहात न अडकता योग्य ती खबरदारी घ्यावी. अन्यथा तुम्ही देखील सेक्स टॉर्शनच्या जाळ्यात अडकु शकता. नकळतपणे अशा ट्रॅपच्या विळख्यात सापडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

सेक्स टॉर्शन म्हणजे काय?

- सेक्स टॉर्शन म्हणजे मोहात पाडू शकणार्‍या किंवा आकर्षक व्यक्तीचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे. तसेच विविध कारणांसाठी त्याला ब्लॅकमेल करून त्याचा वापर करून घेणे.

फोटो घेऊनही केले जाते ब्लॅकमेलिंग..

- कोणत्याही कारणाने तुमचे सेल्फी मागवले जातात, समोरूनही फोटो पाठवले जातात. अचानक एखाद्या न्यूड फोटोवर यूजरचा चेहरा दिसतो अन् यूजरला घाम फुटताे. या फोटोवरून ब्लॅकमेलिंग सुरू होते, परंतु यूजर काहीही करू शकत नाही.

फेसबुक, इंस्टाग्रामसह व्हाट्सअपवर वाढले प्रमाण अधिक

- फेसबुक इंस्टाग्रामवर एखाद्या सुंदर मुलीचा फोटो डिपी ठेवला जातो. त्या माध्यमातून तरुणांना रिक्वेस्ट टाकली जाते. रिक्वेस्ट आल्यानंतर तरुणांना मेसेज केला जातो. याच डीपीला बघून तरुण आकर्षित होतो. संवाद सुरू केल्यानंतर अश्लील संवाद सुरू होतो. येथेच तरुण जाळ्यात अडकून पडतो. हा सर्व प्रकार फेसबुक, इंस्टाग्राम व्हायचा तर आता अलिकडे थेट व्हाट्सअपवर देखील सुरू झाला आहे.

आपण लैंगिक शोषणाला बळी पडल्यास काय करावे?

- घाबरु नका, लक्षात ठेवा की ही तुमची चूक नाही आणि तुम्ही एकटे नाही.

- तुमचा विश्वास असलेल्या एखाद्या व्यक्तीला सांगा जेणेकरुन ते तुम्हाला मदत मिळवण्यात मदत करु शकतील.

- गुन्हेगाराशी संवाद साधणे थांबवा.

- पैसे किंवा अधिक घनिष्ठ सामग्री पाठवून त्यांच्या धमक्यांना बळी पडू नका.

- त्यांच्या ब्लॅकमेल आणि धमक्यांचा पुरावा तुमच्या डिव्हाइसवर ठेवा.

आताच्या जमान्यात कोण कसा 'ट्रॅप' लावेल सांगता येत नाही. त्यामुळंच अनोळखी व्यक्तींशी एका मर्यादेच्या पलीकडं चॅट करण्याच्या मोहात पडू नका. वैयक्तिक माहिती पाठवू नका. अनोळखी कुणी सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा. नकळतपणे तुम्ही यामध्ये अडकला असाल तर घाबरून जाऊ नका. बदनामी भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधुन गुन्हा दाखल करावा जेणेकरून पोलिसांना तपास करून कारवाई करता येईल. संबंधित तक्रारदारचे नाव गोपीनय ठेवले जाईल. सोशल मीडियाचा वापर करताना काळजीपूर्वक करावा.

- हिम्मतराव जाधव

अप्पर पोलीस अधीक्षक

सोलापूर ग्रामीण पोलीस.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com