
Solapur : बाळासाहेबांची शिवसेना धरेना ‘बाळसे’
Solapur- शिंदे सरकार स्थापन होऊन सहा महिने पूर्ण झाले. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना म्हणून ओळख मिळाल्यानंतर सत्ताधारी पक्ष म्हणून घोडदौड सुरू होणे आवश्यक होते. मात्र, चार जिल्हाप्रमुख व तीन संपर्कप्रमुख दिमतीला असताना. दुसरीकडे जिल्ह्याचे सुपुत्र तानाजी सावंत यांच्याकडे मंत्रिपद असतानाही पक्षाचे ‘आरोग्य’ सुधारण्याऐवजी बिघडत जाताना दिसत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवशोत्सवाचे आयोजन केले. मात्र, प्रत्यक्षात अगदीच किरकोळ, सामान्य आणि संख्येने कमी कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. मनीष काळजे यांच्या जोडीला प्रथमेश साठे, अमोल शिंदे यांच्यासह जिल्हाभरातून भाऊसाहेब आंधळकर, चरणराज चवरे यांच्यासारखी मंडळी मिळाली.
मात्र, सर्वसामान्य कार्यकर्ते शिवसैनिकांची वानवा होती. सामान्य कार्यकर्ते एका दिवसात उभे करता येत नाहीत. यासाठी अनेक वर्षे जनसेवेचे अधिष्ठान लागते. त्यातून कार्यकर्ते तयार होतात. फक्त पैशावर मिळणारी माणसे निष्ठेची असू शकत नाहीत. यामुळेच जो शिवसैनिक निष्ठेने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. तसा शिंदे गटाकडे नाही.
अशातच संघटन बांधणीच्या काळात मनीष काळजे यांना डॉ. श्रीकांत देशमुख फाउंडेशनच्या वैद्यकीय मदत कक्ष संपर्क प्रमुख पदावरून बाजूला करण्याची नामुष्की पक्षश्रेष्ठीवर आली याचा विचार केल्यास नव्या शिवसेनेत जुन्याच ‘खोडी’ कायम आहेत, असाच आहे. असेच झाले तर शिंदे ‘गटा’साठी आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी कितीही डोस दिले तरी जिल्ह्यात शिंदे गट प्रबळ होणे मुश्कील होणार आहे.
जुन्या शिवसेनेत काही माणसे ‘तोडपाणी’ करणारी असली तरी ‘मातोश्री’ नावासाठी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी जिवाला जीव देणारे अनेक कार्यकर्ते होते. इतर प्रामाणिक नेते, शिवसैनिक यांच्या नैतिक दबावाखाली काहीजणांची दुकानदारी खपून गेली. मात्र, येथे मुळाला आजार झाला तर झाडे जगणे कठीण होणार आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांचा मतदारसंघ आणि कर्मभूमी जरी उस्मानाबाद जिल्ह्यात असली तरी सोलापूरही त्यांची जन्मभूमी असल्याने सोलापुरातील बाळासाहेबांच्या शिवसेनेवरून त्यांचे राजकीय वजन मोजले जाणार आहे. यामुळे मंत्री महोदयांना सोलापूरकडे दुलर्क्षकरून चालणार नाही. नाही तर आरोग्यामंत्र्यांच्या गावात पक्षाचे आरोग्य बिघडायला वेळ लागणार नाही.
भाजपशी सूर जुळेना..
राज्याच्या सत्तेत बाळासाहेबांची शिवसेना भाजपसमवेत एकत्र आहे. मात्र, स्थानिक नेत्यांचा भाजपशी कुठेही सूर जुळताना दिसत नाही. बार्शी शहरात तर भाजपचे सहयोगी आमदार राजेंद्र राऊत व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या एकदिवसही विस्तव आड जात नाही.
दर दोन दिवसाला एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडतात. राऊत हे अपक्ष आमदार असले तरी भाजपप्रणित असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी घनिष्ठ संबंध असलेले आमदार आहेत तरीदेखील बाळासाहेबांची शिवसेना त्यांची गय करताना दिसत नाही. भाजपच्या इतर नेत्यांबरोबरही जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सूर जुळताना दिसत नाही.
शिंदे-फडणवीस सरकारला सहा महिने होऊन गेले तरीही सोलापूरमधील बाळासाहेबांची शिवसेना अद्यापही म्हणावे तसे ‘बाळसे’ धरताना दिसत नाही. उलट दुसरीकडे ठाकरे सरकार पडल्यानंतर अनेक नेत्यांनी सत्तेबरोबर जाणे पसंत केलेले असतानाही सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेऊन त्यांच्यासोबत कायम आहे.
- अरविंद मोटे