Solapur : श्री सिद्धेश्वर तलावात योगदंडाला करमुटगी स्नान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 श्री सिद्धेश्वर तलावात

Solapur : श्री सिद्धेश्वर तलावात योगदंडाला करमुटगी स्नान

सोलापूर : संबळच्या निनादात, श्री सिद्धेश्वरांच्या जयघोषात सातही नंदीध्वज मिरवणुकीने श्री सिद्धेश्वर तलावाजवळ आले. हळद आणि तेलाच्या मिश्रणाने श्री सिद्धेश्‍वरांची मूर्ती, योगदंड व सातही नंदीध्वजांना हळद लावून करमुटगी स्नान घालून हळद काढण्यात आली तर अमृतलिंगाची पूजा करून गंगापूजन करण्याचा धार्मिक विधी रविवारी (ता. १५) पार पडला.

श्री सिद्धेश्वर यात्रेतील तैलाभिषेक व अक्षता सोहळा या दोन धार्मिक विधींनंतर रविवारी नंदीध्वजांना करमुटगी स्नान आणि होमप्रदीपन सोहळा हा तिसरा मुख्य धार्मिक विधी पार पडला. परंपरेप्रमाणे सकाळी नऊ वाजता हिरेहब्बू वाड्यात मानकऱ्यांच्या हस्ते नंदीध्वजांचे पूजन झाले. संबळ आणि हलग्यांच्या निनादात मिरवणुकीने सातही नंदीध्वज संमती कट्ट्याजवळ आणले. प्रथम श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडास हळद व तेलाचा लेप लावून करमुटगी स्नान घालण्यात आले.

त्यानंतर पालखीतील उत्सव मूर्तीस करमुटगी स्नान घातले. त्यापाठोपाठ सातही नंदीध्वजांना तलावात एकाच वेळी करमुटगी स्नान घालण्यात आले. पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांचे मानकरी हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते अमृत लिंगाजवळ गंगापूजन करण्यात आले. देशमुखांना हिरेहब्बूंकडून विडा देण्यात आला. त्यानंतर गर्भ मंदिरातील श्री सिद्धरामेश्वरांच्या पादुकांस करमुटगी लावून त्या पादुका धुऊन हिरेहब्बूंसह इतर मानकऱ्यांच्या हस्ते गदगीची पूजा करण्यात आली. दुपारी एक वाजता नंदीध्वज हिरेहब्बू वाड्याकडे मार्गस्थ झाले.

अशी होते गंगापूजा

अमृतलिंगाजवळ काळ्या पाषाणाची पूजा केली जाते. या पाषाणाला हळद, कुंकू लावून हार, दांडा घालण्यात येतो. त्यानंतर सुपारी, खारीक, खोबरे, हळकुंडाने खणा-नारळाची ओटी भरण्यात येते. त्यानंतर सर्व साहित्यांसह हिरव्या कपड्यात काळ्या पाषाणाला गुंडाळून सुगडीपूजनातील सूप आणि दुरडीत बंद करून तलावाजवळ मोरआरती करण्यात येते. त्यानंतर मानकऱ्यांकडून मानकरी सूप व दुरडी डोक्यावर ठेवून तलावात सोडण्यात येते. या गंगापूजन विधीचा मान हिरेहब्बू व देशमुख यांना असतो.

असे होते करमुटगी स्नान

लग्नसमारंभ म्हणजे अक्षतापूर्वी हळद लावणे, त्यानंतर अक्षता विधी मग हळद काढणे या ज्या विधी आहेत त्याच पद्धतीने श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यातील तीन प्रमुख विधी आहेत. त्यात पहिल्या दिवशी तैलाभिषेक, मुख्य विधी अक्षता सोहळा आणि अक्षता सोहळ्यानंतर हळद काढण्याचा विधी म्हणजे करमुटगी स्नान होय. श्री सिद्धरामेश्वरांचे प्रतिकात्मक रूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगदंडाची व नंदीध्वजांची हळद काढली जाते. श्री सिद्धेश्‍वरांनी निर्मिलेल्या तलावात हा विधी केला जातो.