Political News: भाजपची नवी रणनीती; प्रणिती शिंदेंसाठी ‘मध्य’मध्ये डोकेदुखी

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा आणि आमदार प्रणिती शिंदे यांचा गड.
आमदार प्रणिती शिंदे
आमदार प्रणिती शिंदे sakal

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा आणि आमदार प्रणिती शिंदे यांचा गड. हा गड शाबूत राखण्यासाठी त्यांनी आजवर वाट्टेल ती तडजोड केली. दरम्यान, हाच गड भाजपला आता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायचा आहे.

कारण सोलापूर शहरातील शहर उत्तर आणि शहर दक्षिण या दोन विधानसभेच्या गडांवर भाजपचे ‘कमळ’ फुललेले आहे. त्याप्रमाणे शहर मध्यवर ‘कमळ’ फुलविले की सोलापूर शहरातील तिन्ही मतदारसंघावर भाजपची हुकमत येणार आहे. म्हणून शहर मध्य विधानसभेवर भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

- शिवाजी भोसले

सोलापूर शहर मध्यवर कमळ फुलविण्यासाठी मतांची मोठी व्होट बँक भाजपने काबीज करण्याचे धोरणे आखून तसे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या मतदार संघात सेटलमेंट परिसराचा मोठा भाग समाविष्ट आहे. येथे कैकाडी, टकारी, पारधी, मांगगारुडी, कंदर भाट, रजपूत भामटा, पामलोर, छप्परबंद अशा साधारण मूळच्या नऊ आणि त्यामध्ये आणखीन समाविष्ट झालेल्या,

पाच अशा एकूण १४ भटक्या विमुक्त समाजाचे लोक येथे राहतात. त्यांची मोठी व्होट बँक या ठिकाणी आहे. आजवर ही व्होट बँक काँग्रेसच्या पाठीशी राहिली आहे. तथापि, येथील भटक्या विमुक्त समाजामधील मतदारांनी खासदारकीला सुशीलकुमार शिंदे आणि आमदारकीला प्रणिती शिंदे यांचे नेतृत्व मान्य करुन प्रत्येक निवडणुकीला त्यांच्या पाठीशी ताकद लावली.

मात्र, आता भाजपला हेच चित्र बदलायचे आहे. तारेच्या कुंपणामधून मुक्त केलेल्या भटक्या विमुक्तांना त्यांच्या हक्काच्या सेटलमेंट भागातील ९० एकर जागेवर मोठा महागृह प्रकल्प राबवायचा अन्‌ या संबंधितांना त्यांच्या हक्काचे घर देऊन या समाजाला आपलेसे करायचे, ही भाजपची नवी रणनीती आहे.

या रणनितीनुसार, भाजपने काम सुरु केले आहे. खास बाब म्हणजे, राज्यात व केंद्रात भाजपची आबादी आबाद सत्ता असल्याने या पक्षाची शहर मध्य विधानसभेमधील रणनीती निश्‍चित यशस्वी होऊ शकते. तशी खंबीर आणि यशस्वी पाऊलदेखील पडली आहेत.

सेटलमेंट परिसरात भटक्या विमुक्तांसाठी ९० एकर जागेवर १५ हजार घरांचा गृहप्रकल्प उभारण्याच्यादृष्टीने फाईलीला पाय फुटून ती गतिमान झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या गृहप्रकल्पाच्या भूमिपूजनाला आणून त्यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ भटक्या विमुक्तांच्या हाती देऊन त्यांना काँग्रेसमुक्त करण्याचे धोरण आहे.

भाजपच्या या धोरणाचा फटका आगामी विधानसभेच्या निवडणुकीला प्रणिती शिंदे यांना बसू शकतो. ज्या ठिकाणी भाजप १५ हजार घरांचा प्रकल्प उभारत आहे, त्या ठिकाणी भटक्या विमुक्त समाजाची काही हजारांची व्होट बँक आहे. जी व्होट बँक मागील विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यात निर्णायक ठरली होती. तीच व्होट बँक प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या ताब्यातून जाऊ शकते. याचा परिणाम शिंदे पिता अन्‌ कन्येच्या राजकारणावर होणार आहे.

शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष

प्रणिती शिंदे या शहर मध्यमधून विधानसभेला पुन्हा उभ्या ठाकल्यास त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. मागील विधानसभेवेळी या मतदार संघात ‘हायव्होल्टेज ड्रामा’ निवडणूक झाली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात प्रणितींनी बाजी मारली. तशी त्यांच्यासाठी तत्कालीन निवडणूक अजिबात सोपी नव्हती. मात्र, पडद्यामागे काही तहाच्या गोष्टी घडवून आणल्यामुळे त्यांना विजयाची हॅटट्रिक साधता आली.

वास्तविक प्रणिती शिंदे यांच्यासाठी विधानसभेला अनेक मोठी आव्हाने आहेत, त्यातच आता येथील भटक्या विमुक्तांची मोठी अन्‌ हक्काची व्होट बँक त्यांच्या हातामधून निसटणार असल्याची स्थिती असल्याने प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत. तथापि, ही व्होट बँक राखण्यासाठी प्रणितींची काय भूमिका असणार हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे.

लक्षवेधी

  • सुशीलकुमार शिदेंना खासदारकीला तर प्रणिती शिंदेंना आमदारकीला भटक्या विमुक्तांच्या व्होट बँकेचा बसणार चाप

  • भटक्या विमुक्तांची व्होट बँक हातामधून निसटू न देण्याचे शिंदे पिता-कन्येपुढे मोठे आव्हान

  • भटक्यांसाठी गृहप्रकल्प उभारण्याला भाजपकडून सत्तेचा उपयोग

  • लोकसभा अन्‌ विधानसभा निवडणुकीपूर्वी गृहप्रकल्पाच्या पायाभरणीचा भाजपचा व्होरा

  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भूमिपूजनासाठी आणून भटक्यांमध्ये ‘कमळ’ फुलविण्याचा भाजपचा मोठा घाट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com