Solapur : स्टार्टअपसाठी व्यावसायिक कौशल्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

startup

Solapur : स्टार्टअपसाठी व्यावसायिक कौशल्ये

अमित बाळकृष्ण कामतकर संचालक, विद्या कॉम्प्युटर्स, सोलापूर, थिंक ट्रान्स फाऊंडेशन, मो. ९४२२०६६२८७

व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून तुम्ही स्वत:स स्टार्टअपसाठी तयार करू शकता, ज्यामुळे नक्कीच तुमचा स्टार्टअप यशस्वी होऊ शकेल. पुढील व्यावसायिक कौशल्यांच्या माध्यमातून तुम्ही यशस्वी कसे होऊ शकाल, व्यवसाय चालविणे ही एक कला आहे आणि तुमच्याकडील उत्तम व्यावसायिक कौशल्ये स्टार्टअप बनवू शकतात, ती नसतील तर नक्कीच स्टार्टअप बंद करावा लागेल.

२० टक्के व्यवसाय पहिल्या वर्षात अयशस्वी झाल्याच्या काही क्लेशदायक तक्रारी माझ्याकडे येतात, त्यावेळी वाटतं सुरवातीपासून यां मंडळींनी इनक्युबेशन सेंटरची मदत , मार्गदर्शन घ्यायला हवे होते. स्पर्धात्मक आणि गजबजलेल्या बाजारपेठेत तुमचे स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी कौशल्ये मदतगार सिद्ध होत आहेत, पुन्हा सांगतो ती आत्मसात करावीत. तुमच्या स्टार्टअपची कल्पना कितीही चांगली असली आणि तुम्हाला त्या क्षेत्रातील कितीही चांगली माहिती असली तरीही कौशल्यांशिवाय तुम्ही व्यवसायात जास्त दूर जाऊ शकणार नाही. तुम्ही यशस्वी कसे होऊ शकाल, यासाठीच या लेखात काही आवश्यक कौशल्यांचे मार्गदर्शन करीत आहे.

पण व्यावसायिक कौशल्ये म्हणजे काय? तर ही अशी कौशल्ये आहेत जी तुमच्या व्यवसाय व्यवस्थापनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. स्टार्टअपसाठी आवश्यक सामान्य कौशल्यांमध्ये सॉफ्ट स्किलचा समावेश होतो.

पैसे कमविणे हा कोणत्याही व्यवसायाचा मुख्य हेतू. तुम्ही तुमचा कोणताही स्टार्टअप उघडा, त्यातून नफा कमविणे हाच तुमचा मुख्य उद्देश असायला हवा. तुमच्याकडे व्यावसायिक कौशल्ये नसल्यास यशस्वी होणं अवघड. व्यावसायिक कौशल्ये शिका आणि स्टार्टअपमध्ये यश मिळवा.

कुतूहल : खरे नावीन्य हे आउट ऑफ द बॉक्स विचारातूनच येते. बऱ्याचवेळा कुतूहल दुर्लक्षित होते, आपण स्टार्टअप करतो म्हणजे काय? तर समाजात, तुमच्या अवती-भवती भेडसावणाऱ्या समस्यांवर सर्वोत्तम उपाय शोधण्यासाठी शिकणे, शोधणे. तुमची जिज्ञासा स्टार्टअपमध्ये नावीन्य आणि बदल घडवून आणण्यास मदत करते. ‘क्युरिऑसिटी’ हा शब्द मला खूप भावतो, अर्थ एकच आहे पण इंग्रजी शब्दांत जास्त कुतूहल दडलं आहे, असे वाटते. पूर्वी अनेक गोष्टींचे कुतूहल असायचे, पण आताच्या पिढीस त्याचे फार काही नाही, कारण बऱ्याच गोष्टी त्यांना सहज प्राप्त होतात. पूर्वी पूर्ण वाड्यात एकच टेलिव्हिजन सेट असायचा, त्याचे फार कुतूहल वाटायचे; आता सारं काही बोटांवर स्थिरावलेलं असल्याने फारसं कुतूहल राहिलं नाही. पण हेच खरे चॅलेंज आहे, त्यात कुठे काय नवीन आहे आणि तुम्ही काय नवीन बदल करू शकता हे शोधणं, नव्या पिढीने तेच करावं या मताचा मी आहे.

चैतन्यमूर्ती : नवीन व्यवसाय करीत असताना तुम्ही स्वत: प्रेरित असणे क्रमप्राप्त आहे आणि असावं देखील. स्टार्टअप यशाच्या मार्गावर जात असताना अनेक गोष्टींचा प्रतिकार करावा लागेल. निराश होऊ नका, अपयश स्वीकारू नका, स्पर्धा करा. यश नक्की मिळेल. संयम महत्त्वाचा. शेवटी एका रात्रीत तुम्ही यशस्वी होणार नाहीत, त्यासाठी अनेक दिवस काम करावं लागेल, हे ध्यानात असू द्या. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारे बना, यश तुमची वाट पाहात असेल.

सर्जनशीलता : सर्व स्टार्टअप्सनी प्रयत्न केले पाहिजेत. पूर्वी जे केले त्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची धमक तुमच्यात असावी. जर तुमचे उत्पादन किंवा सेवा बाजारातील इतर वस्तूंसारखीच असेल तर कोणाला तुमचे उत्पादन / सेवा का म्हणून हवी असेल? इथेच सर्जनशीलतेचा कस लागतो. सर्जनशील होणं म्हणजे काय? नावीन्य शोधा, कारण बाजारपेठेत त्यालाच डिमांड आहे.