Solapur : अभ्यासाचे करा चोख नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Students

Solapur : अभ्यासाचे करा चोख नियोजन

सोलापूर : बारावीची बोर्डाची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची २ मार्चपासून सुरू होणार आहे. वेळापत्रकात काहीसा बदल होईल, पण सुरवात त्याच तारखेला होणार आहे. दोन पेपरमध्ये एक दिवसाची सुटी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे टेन्शन न घेता परीक्षेला सामोरे जावे. रात्री दहानंतर अभ्यास करण्यापेक्षा पहाटे लवकर उठून अभ्यास करावा. पहाटेचा अभ्यास नेहमीच लक्षात राहील. बोर्डाच्या परीक्षांचे टेन्शन घेऊन १०-१२ तास सलग अभ्यास करण्यापेक्षा वेळेचे नियोजन करून कमी वेळेतच चांगला अभ्यास केला; तरी उत्तम गुण मिळतील.

१. वेळेचं नियोजन हा यशाचा उत्तम आणि यशस्वी मार्ग आहे. यशस्वी व्हायचे असल्यास अगोदर पूर्वतयारी महत्त्वाची आहे. एकाच विषयाला जास्त वेळ देऊ नका, अवघड विषयाला खूपवेळ न देता सोपा वाटणारा विषय आधी अभ्यासा.

२. छंद जोपासण्यासाठी किंवा आपण जे नियमित करतो त्यातूनही तीन ते चार तास वेळ हा अभ्यासासाठी राखून ठेवायचा आहे, मग तो सकाळचा असूदे किंवा संध्याकाळचा.

३. आधी विषयांचे व वेळेचे नियोजन करा. अवघड व सोपे जाणारे विषय, अधिक गुण मिळवून देणारे प्रश्न आणि उत्तीर्ण होण्यासाठी कोणते प्रश्न अगोदर सोडवायला हवेत, याचे मूल्यमापन करा.

४. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, पूर्वपरीक्षांचे पेपर, त्यातील प्रश्नांचा अभ्यास विशेष करा. झोपण्याआधी थोडंसं सोप्या विषयाचे वाचन करा. त्यामुळे वाचनही होईल, रात्री टेन्शन येणार नाही आणि झोपही चांगली येईल.

५. वर्गात शिकवताना काढलेल्या नोट्‌सवरून परीक्षेपूर्वी स्वत:च्या नोट्‌स तथा महत्त्वाच्या वर्णनात्मक प्रश्नांचे पॉइंट्स (मुद्दे) काढा. परीक्षेपूर्वी वर्णनात्मक उत्तरे वाचा व परीक्षेला जाताना मुद्दे लक्षात ठेवा.

६. अभ्यास करताना इतर कोणतीही कामे करू नका. सोशल मीडिया, मनोरंजनाची साधने किंवा काहीच खाणे नाही. तीन तास फक्त अभ्यासच करावा. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या गोष्टी दिवसभर करू शकता.

७. भाषा विषयाचा अभ्यास करताना गाईडऐवजी पुस्तकावर भर द्या. आपल्या शब्दातच उत्तरे लिहावीत. उत्तरामध्ये म्हणी, वाक्प्रचार, अलंकारांचा वापर असावा. अभ्यासावेळी धड्याचं वाचन प्रस्तावनेपासून बारकाईने करावे. त्यामुळे प्रश्न कितीही फिरवून आला, तरी उत्तर लिहिणं सोपं होतं.

८. गणित सोडवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. प्रत्येक फॉर्म्यूला आणि स्टेपला महत्त्व असते. त्यामुळे त्या गाळू नका. प्रत्येक वर्षातील गणिताचे धडे महत्त्वाचे असतात, ते एकमेकांसोबत लिंक केलेले असतात.

९. स्वत:वर विश्वास ठेवा. मेडिटेशन करा. दिवसातले तीन तासच, पण खूप चांगला अभ्यास करा. तो मन लावून न चुकता करायला हवा; जेणेकरून मनावर कोणताही ताण राहणार नाही.

१०. अभ्यासाचा वेळ टप्प्यांमध्ये वाटून घ्या. अभ्यासावेळी फक्त आणि फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करा. टीव्हीवर काय चालू आहे, मोबाईलवर कोणी काय मेसेज केलाय, कोणाचा कॉल आलाय, याकडे अजिबात लक्ष देऊ नका.

असाध्य ते साध्य करिता सायास...

जगात मनुष्याला जे काही असाध्य वाटत असेल, ते कष्टाने, प्रयत्नाने साध्य होते. त्याला कारण अभ्यास आहे. अभ्यासाचा अर्थ असा की, ईप्सित साध्य होईपर्यंत अविरत प्रयत्नशील राहणे. त्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।