frp
frpesakal

Solapur : FRP देण्यात ३५ कारखान्यांचा हात आखडता

सोलापूर विभागातील कारखान्यांकडे एकूण ६९१.४३ कोटींची थकबाकी

माळीनगर : एक-दोन कारखान्यांचा अपवाद सोडला तर सोलापूर विभागातील कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. हंगाम आटोपत आला तरीही सोलापूर विभागातील ५० पैकी ३५ कारखान्यांनी एफआरपी देण्यात हात आखडता घेतला आहे.

सोलापूर विभागातील ३५ कारखान्यांकडे मार्चअखेर बेसिक १०.२५ टक्के रिकव्हरीनुसार एकूण ६९१.४३ कोटी रुपये एफआरपीची थकबाकी आहे. सहकारीच्या तुलनेने खासगी कारखान्यांकडे थकबाकी अधिक आहे. काही कारखान्यांची डिसेंबरपासूनची ऊसबिले थकली आहेत. बहुतांश कारखाने बंद झाले तरी थकीत ऊसबिले मिळत नसल्याने शेतकरी कारखान्यांकडे हेलपाटे मारत आहेत.

सोलापूर विभागातील ५० साखर कारखान्यांनी यंदा हंगाम घेतला. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ३७ तर धाराशिव जिल्ह्यातील १३ कारखान्यांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामातील मार्च अखेरपर्यंतचे ‘एफआरपी’चे बेसिक रिकव्हरीप्रमाणे ४४६७.६८ कोटी रुपये ऊसबिलाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीचे ३५१२.२५ कोटी तर धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांनी ९५५.४३ कोटी रुपये मार्चअखेर दिले आहेत. असे असले तरीही सोलापूर जिल्ह्यातील २८ कारखान्यांकडे एफआरपीचे ६२१.८० कोटी तर धाराशिव जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडे ६९.६३ कोटी रुपये थकीत आहेत. सीताराम महाराज, विठ्ठलसाई, श्री शंकर, सिद्धनाथ या कारखान्यांचा मार्चअखेरचा एफआरपी अहवाल अद्याप साखर आयुक्तालयास प्राप्त झाला नाही.

गेल्या आठवड्यात साखर आयुक्तांची भेट घेतली आहे. एफआरपी पूर्ण करण्याच्या सूचना कारखान्यांना द्याव्यात अथवा त्यांच्यावर आरआरसी करावी. तसेच १५ टक्के व्याजासह एफआरपी वसूल करावी, अशी मागणी केली आहे. साखर आयुक्तांनी त्याप्रमाणे कारखान्यांना पत्रे लिहिली आहेत. त्यांनी दिलेल्या मुदतीत कारखान्यांनी एफआरपी दिली नाही तर १५ टक्के व्याजासह ती वसूल होईल. दोन कारखान्यांवर त्यांनी आरआरसी केली आहे. टप्प्या- टप्प्याने इतर कारखान्यांवर करतो, असे त्यांनी सांगितले आहे.

- राजू शेट्टी,अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

एफआरपी कायद्याची पायमल्ली; शेतकरी वेठीस

कारखान्यांमध्ये उसाचे गाळप झाल्यावर १४ दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक कारखाने या नियमाची पायमल्ली करताना दिसत आहेत. राज्य शासनाने साखर कारखान्यांच्या त्या-त्या हंगामातील सरासरी साखर उताऱ्यानुसार एफआरपी देण्यासंदर्भात गेल्यावर्षी फेब्रुवारीला आदेश काढला होता.

त्यानुसार उसाचे गाळप झाल्यानंतर बेसिक रिकव्हरीप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांना द्यायचा. अनेक कारखाने थेट उसाच्या रसापासून, ‘बी’हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मिती करत असल्याने उर्वरित रक्कम कारखाना बंद झाल्यावर १५ दिवसांत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून अंतिम साखर उतारा निश्चित करून त्यानुसार शेतकऱ्यांना द्यावी, असे आदेशात म्हटले होते. परंतु, या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे.

अनेक कारखान्यांनी डिसेंबरपासूनचा पहिला हप्ताच अजून दिला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे साखर उतारा निश्चित होऊन थकीत हप्त्यासह अंतिम ऊसबिले कधी मिळणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ऊसबिलासाठी शेतकरी कारखान्यावर हेलपाटे मारून बेजार झाले आहेत.

कारखानानिहाय मार्चअखेर थकीत एफआरपी (कोटीत)

सोलापूर जिल्हा : सिद्धेश्वर - ३४.५८, संत दामाजी - १.१९, श्री मकाई - २६.३२, संत कुर्मदास - ११.३०, लोकनेते - २६.४२, सासवड माळी - २२.७१, लोकमंगल (बीबीदारफळ) - १०.६३, लोकमंगल (भंडारकवठे) - ४.१३, सिद्धनाथ - ४८.८३, जकराया-१३.६५, इंद्रेश्वर - १५.८३, भैरवनाथ (विहाळ) - २९.२२, भैरवनाथ

(लवंगी)- ३०.८७, युटोपियन - १९.८५, मातोश्री शुगर - २३.६४, भैरवनाथ (आलेगाव) - ३६.९२, बबनरावजी शिंदे - ४.३६, ओंकार - ०.५०, जयहिंद - १२.४७, विठ्ठल रिफाइंड - ८३.०७, आष्टी शुगर - १७.४३, भीमा - ५०.०४, सहकार शिरोमणी - ४४.२५, सीताराम महाराज - ९.१९, धाराशिव (सांगोला) - १२.२२, श्री शंकर - २३.२९, आवताडे शुगर्स - १४.३८, येडेश्वरी - २.६७.

धाराशिव जिल्हा : विठ्ठलसाई - ४.८५, भैरवनाथ (वाशी) - १७.४६, भीमाशंकर - १.७०, धाराशिव (कळंब) - ८.१४, भैरवनाथ (सोनारी) - २९.५१, लोकमंगल माऊली - ३.२५, डीडीएनएसएफए - १.२८, गोकूळ शुगर्स (श्री तुळजाभवानी) - ३.४४.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com