Solapur : कर्नाटकी गुळाचा सोलापुरातून हरवतोय गोडवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळ

Solapur : कर्नाटकी गुळाचा सोलापुरातून हरवतोय गोडवा!

सोलापूर : येथील गुळाच्या बाजारपेठेत दाखल होणाऱ्या कर्नाटकातील गुळाची परंपरा खंडित होत चालली आहे. सद्य:स्थितीत अगदी पूर्वीच्या तुलनेत पाच टक्के आवक कशीबशी होत आहे. या स्थितीत स्थानिक गूळ उत्पादकांची कर्नाटकात गूळ पाठविण्याची संधी उभी राहिली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर गुळाच्या व्यापाराची परंपरा तशी जुनीच आहे. या परंपरेला आता बदलत्या स्थितीचा तडा बसू लागला आहे. सुरवातीला सोलापूरच्या सीमावर्ती भागात गुळाचा व्यापार अगदी मोठ्या प्रमाणात सुरू होता. कर्नाटकाच्या बहुतांश भागात गुळाचे उत्पादन चांगल्या पद्धतीने होत होते.

पण मागील काही वर्षात परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. ग्रामीण रस्त्यांचे जाळे वाढत गेले. त्यासोबत नदीकाठी असलेला ऊस साखर कारखान्यांना नेणे शक्य होऊ लागले. ग्रामीण दुर्गम भागात केवळ वाहतुकीची सोय नसल्याने चालणारी गुऱ्हाळांची संख्या कमी होत गेली. त्यासोबत गुळाचे उत्पादन घटत गेले.

केवळ विजयपूर बाजार समिती सोलापूरशी जोडली गेली आहे. अन्य बाजार समित्यांची संख्या कमी असल्याने गुळाच्या बाजाराची अडचण वाढली आहे. जे उत्पादक सीमावर्ती भागातून गूळ आणतात, त्यांना सेल्स टॅक्स चेक पोस्टचा अडथळा होता. तो अडथळा दूर झाला असला तरी अडचणी कायमच आहेत.

कारण, गुळाचा माल निघाला तर पोलिस हा गूळ दारू गाळण्यासाठीचा आहे, असा संशय धरून अडवतात. त्यामुळे व्यापार करण्याऐवजी विनाकारण शिक्षा होते. वाहनात अधिक माल भरला तर परिवहन खात्याकडून कारवाई होते. याशिवाय गूळ उत्पादनासाठी असलेला मजुरांचा प्रश्न देखील तेवढाच गंभीर झालेला आहे. त्यामुळे मागील काही वर्षात कर्नाटकच्याच गुळाची आवक जवळपास बंद झाली आहे.

सध्या विजयपूरच्या बाजारात सांगली भागातून गूळ अधिक प्रमाणात जातो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गुळाची विक्री कर्नाटकात वाढत चालली आहे. सांगली भागातून वाढत चाललेली गुळाची आवक कर्नाटकच्या बाजारपेठेला भक्कम करणारी आहे. कर्नाटकाचे गुळासाठी महाराष्ट्रावरील अवलंबित्व वाढत चालले आहे.

एकीकडे कर्नाटकातील गुळाची आवक थांबल्यानंतर सोलापूर बाजारपेठेला मराठवाड्याची साथ मिळू लागली आहे. लातूर भागातील गूळ उत्पादक मोठ्या प्रमाणात गूळ आणतात. तसेच लातूरच्या गुळाची बाजारपेठ देखील सोलापूरशी जोडलेली आहे. बदलत्या जीवनशैलीत गुळाचे वाढत चाललेले महत्त्व पाहता, या स्थितीत स्थानिक गूळ उत्पादकांची उत्पादनाची संधी वाढत चाललेली आहे.

काय घडतंय कर्नाटकात?

ग्रामीण रस्त्यांचे जाळे वाढल्याने उसाची वाहतूक साखर कारखान्यांकडे वाढली

साखर कारखान्यांच्या संख्येत वाढ

बाजार समित्यांची संख्या कमी असल्याने विक्रीला बंधने

हातभट्टीसाठी वापरला जाणारा गूळ म्हणून माल वाहतुकीला आडकाठी

आरटीओचे माल वाहतुकीला मोठ्या प्रमाणात दंड

सोलापुरातून कर्नाटकात गुळाची वाहतूक मात्र सुरू

मागील काही वर्षात कर्नाटकच्या गुळाची आवक झाली नगण्य

लातूर भागातील गुळाच्या आवकीने सोलापूरच्या स्थानिक बाजाराचे संतुलन

कर्नाटकाच्या गुळाची आवक मागील काही वर्षात सातत्याने घटत चालली आहे. त्यासाठी अनेक कारणे असली तरी आता महाराष्ट्रातील गूळ कर्नाटकात पाठवला जात आहे. साखर उत्पादनाच्या स्पर्धेमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

- आनंद दुलंगे,गूळ व्यापारी, मार्केट यार्ड, सोलापूर