Solapur : तुम्ही अडचणीत आहात का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

Solapur News : तुम्ही अडचणीत आहात का?

सोलापूर : निराधार, अडचणीतील प्रत्येक नागरिकाला त्या परिस्थितीत पोलिस ठाण्यापर्यंत जाता येत नाही. अशावेळी त्यांना ११२ या टोल फ्री क्रमांकावरून १० ते १७ मिनिटांत पोलिसांकडून मदत मिळते. ९ सप्टेंबर २०२१ रोजी हा टोल फ्री क्रमांक सर्वांसाठीच खुला करण्यात आला. शहरात सात तर ग्रामीणमध्ये २५ पोलिस ठाणी आहेत. मागील १४ महिन्यांत शहर-ग्रामीणमधील २४ हजार ८५७ व्यक्तींना पोलिसांनी काही वेळातच मदत केली आहे.

गावात चोरी झाली, रस्त्यावर भीषण अपघात झालाय, पती मारहाण करतोय, सासरच्यांकडून छळ होतोय, मुले सांभाळत नाहीत, मुलगा-मुलगी हरवलीय, किरकोळ कारणातून कोणीतरी अडवून मारहाण किंवा शिवीगाळ करतोय, आग लागलीय, अशा अनेक बाबींमध्ये पोलिसांनी अनेकांना मदत केली आहे. त्यासाठी शहरातील जवळपास अडीचशे तर ग्रामीणमधील चारशे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले असून, त्यांच्याकडे स्वतंत्र वाहने देखील देण्यात आली आहेत.

मोबाईलमध्ये बॅलन्स नसतानाही ११२ क्रमांकावर कॉल लागतो. केलेला कॉल पहिल्यांदा मुंबई कार्यालयात जातो, तेथे बिझी लागल्यास तो कॉल नागपूर कार्यालयात जातो. तक्रारदाराची माहिती घेऊन तो कॉल लगेचच संबंधित जिल्ह्याला ट्रान्स्फर होतो. तेथून संबंधित पोलिस ठाण्याला तक्रारदाराची माहिती दिली जाते. ही प्रक्रिया अवघ्या दोन मिनिटांत होते. तक्रारदार व्यक्तीला १० ते १५ मिनिटांत मदत मिळेल, अशी ही मजबूत यंत्रणा आहे. ग्रामीण पोलिसांची यंत्रणा अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश मणुरे, गोविंद राठोड, शहाजी जाधव व तंत्रज्ञ संजय लांडगे आणि सागर पासोडे हे सांभाळतात. शहराची यंत्रणा पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी तळे, तंत्रज्ञ सुफियान सय्यद हे सक्षमपणे सांभाळत आहेत.

शहराची स्थिती

एकूण कॉल

१५,०६१

महिलांचे कॉल

२,७८३

ज्येष्ठ नागरिकांचे कॉल

४४८

मारामारी, चोरीचे कॉल

२,२८३

मदतीची सरासरी वेळ

१० ते १२ मिनिटे

ग्रामीणची स्थिती

एकूण कॉल

१९,७९६

महिलांचे कॉल

२,७१५

ज्येष्ठ नागरिकांचे कॉल

४४०

मारामारी, चोरीचे कॉल

१,९५८

मदतीची सरासरी वेळ

१५ ते १७ मिनिटे

...काही गमतीशीर कॉल

एकजण दारू प्यायला. जिल्ह्यातील एका ढाब्यावर गेला आणि उधार दारू देत नाही म्हणून त्याने ११२ क्रमांकावर कॉल केला होता. दुसरीकडे, बायको घरात घेत नाही म्हणून एकाने शहर पोलिसांना कॉल केला होता. तर दुसऱ्याने बायको नांदायला येत नाही, तुम्ही जरा सांगा म्हणूनही कॉल केला होता. एका तर पठ्ठ्याने दारू प्यायला बसल्यावर स्नॅक्स संपला म्हणून कॉल केला होता, असे अनुभव पोलिसांनी सांगितले. परंतु, विनाकारण कॉल करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होतो, याचे भान सर्वांनीच ठेवावे. त्या फेक कॉलमुळे गरजूंना मदत मिळत नाही.

अग्निशामक व रुग्णालयाचीही मिळेल मदत

गृह विभागाकडून नागरिकांना पोलिसांच्या माध्यमातून सर्वच प्रकारची मदत मिळावी, या हेतूने आता आगामी काही दिवसांत अग्निशामक व रुग्णालयाचीही मदत दिली जाणार आहे. ११२ या यंत्रणेला राज्यातील सर्वच रुग्णालये व अग्निशामक विभाग जोडले जाणार आहेत. आग लागली असेल किंवा रस्ते अपघात झालाय आणि त्यातील जखमींना तत्काळ उपचार हवे असतील तर तेही मिळणार आहेत. त्यासंबंधीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

टॅग्स :Solapurpolicesolapur city