सोलापूर : शहरात अनधिकृत रिक्षांचा पुन्हा सुळसुळाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rickshaws

सोलापूर : शहरात अनधिकृत रिक्षांचा पुन्हा सुळसुळाट

सोलापूर: शहराच्या विविध मार्गांवर विनापरवाना, आवश्यक कागदपत्रे, प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना आणि बॅच नसताना देखील बेकायदेशीरपणे रिक्षा धावत आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेकायदेशीर रिक्षाचालकांच्या अरेरावी आणि मनमानीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याचबाबतीत काही तक्रारी वाहतूक पोलिस विभागातील अधिकाऱ्यांकडे प्राप्त होताच २०० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली; मात्र पुन्हा शहरात अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट पुन्हा वाढल्याचे समोर आले आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात जवळपास १२ हजार ५०० रिक्षांची सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात नोंद नसलेल्या अनधिकृत रिक्षा शहरात धावत आहेत. हे रिक्षाचालक मनमानीपणे थेट भाडे आकारत आहेत. त्याचबरोबर महिला, तरुणी रिक्षामध्ये बसताच मोठ्या आवाजात गाणी वाजवणे आदी प्रकार होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहतूक कोंडी

शहराचा सर्वांत वर्दळीचा रस्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक ओळखला जातो. या ठिकाणी ग्रामीण तसेच शहरातील नागरिक खरेदी, प्रवास आदी कारणांसाठी येतात. या परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने रस्त्यावर मांडली आहेत. त्याचबरोबर मनमानी पद्धतीने रिक्षाचालक रिक्षा कुठेही थांबवीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून वाट काढावी लागते. त्याचबरोबर पालिका प्रशासन आणि पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले नसल्याने नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रिक्षामध्ये तीन प्रवाशांची वाहतूक करण्याचा नियम असताना एका रिक्षामध्ये पाच ते सहा प्रवासी कोंबलेले असतात. अनेक वेळा जादा भाडे आकारले जाते. तसेच रांगा न लावता मनमानी पद्धतीने रिक्षा लावल्याने इतर वाहतुकीला अडचण निर्माण केली जात आहे.

शहरामध्ये प्रामाणिक रिक्षाचालक शासनाचा टॅक्स, इन्शुरन्स, पीव्हीसी व सर्व प्रकारचे कर भरतात. अशा प्रामाणिक रिक्षाचालकांना शहर वाहतूक शाखा व आरटीओ यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे. अनधिकृत रिक्षांवर कारवाई कराव, परंतु जे प्रामाणिक रिक्षाचालक आहेत त्यांना त्रास झाला नाही पाहिजे.

महिपती पवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेल, सोलापूर

मनमानी पद्धतीने रिक्षाभाडे आकारणाऱ्या रिक्षा चालकांवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई करण्यात आली असून, यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार आहे. मागील तीन दिवसांत २०० रिक्षांवर कारवाई केली असून, रिक्षा चालकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत.

अजय परमार, सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक, सोलापूर शहर

Web Title: Solapur Unauthorized Rickshaws Re Emerge City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top