Solapur: श्री विठ्ठल-रुक्‍मिणीला महापूजेसाठी बनारसी पोशाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री विठ्ठल-रुक्‍मिणीला महापूजेसाठी बनारसी पोशाख

श्री विठ्ठल-रुक्‍मिणीला महापूजेसाठी बनारसी पोशाख

पंढरपूर (सोलापूर) : सावळ्या विठुरायाचे आणि रुक्‍मिणी मातेचे रुप अधिक खुलून दिसावे यासाठी कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी विठ्ठलाला निळ्या रंगाचा बनारसी अंगारखा तर रुक्‍मिणी मातेला हिरव्या रंगाची कांजीवर पैठणी असा उंची वस्त्रांचा पोशाख परिधान करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली. सोमवारी (ता. 15) पहाटे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. महापूजेच्यावेळी देवाला उंची भरजरी वस्त्रांचा पोशाख परिधान केला जातो.

यावर्षी कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी औरंगाबाद येथील भाविक जुगलकिशोर वर्मा यांनी विठ्ठलासाठी बनारसी सिल्क धाग्याचा अंगारखा तर रुक्‍मिणी मातेसाठी हिरव्या रंगाची कांजीवरम पैठणी असे महावस्त्र परिधान करण्यासाठी मंदिर समितीकडे भेट म्हणून दिले आहे. त्यानुसार कार्तिकीच्या महापूजेवेळी उंची वस्त्र विठुरायाला आणि रुक्‍मिणी मातेला परिधान करण्यात आला आहे. याबरोबरच विठ्ठलाला पिवळ्या रंगाचे पितांबर आणि शेलाही परिधान करण्यात येणार आहे. निळ्या रंगाच्या बनारसी सिल्क महावस्त्रावर अत्यंत सुरेख पध्दतीने नक्षीकाम करण्यात आले आहे. उंची महावस्त्रामुळे कार्तिकी दिवशी विठुरायाचे रुप अधिकच खूलून दिसणार आहे.

हेही वाचा: बार्शी : आमदार राऊत यांच्या अंगावर केमिकल टाकण्याचा प्रयत्न

मंदिरात देशी विदेशी फुलांची सजावट

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात विविध देशी विदेशी अशा तेरा प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांच्या वतीने मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. साजवटीसाठी त्यांनी सुमारे पाच टन फुलांचा वापर केला आहे. देवाचा गाभारा, सोळखांबी, प्रवेशद्वार, सभामंडप, रुक्‍मिणी मंडपासह नामदेव पायरीजवळही विविध फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे.

फुलांच्या सजावटीमुळे मंदिर खुलून दिसत आहे. यामध्ये झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, जरबेरा, आर्किड, लीलियम, कामिनी, तुळशी, तगर, गुलाब, गुलछडी अशा विविध प्रकारच्या फुलांचा आणि पानांचा वापर केला आहे. गेल्या सहा वर्षापासून राम जांभूळकर विठ्ठल मंदिरात कार्तिकीची फुल सजावटीची सेवा करत आहेत. यावर्षी ही त्यांनी सजावटीची सेवा केली आहे. कोरोना नंतर मंदिर खुले झाले. त्यातच कार्तिकीची सोहळा साजरा होत आहे. देवाची सेवा करण्याची संधी मिळावी अशी भावना राम जांभूळकर यांनी व्यक्त केली.

loading image
go to top