
Solapur : कालवा फुटून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची ; आ.मोहिते पाटील यांनी केली पाहणी
मोहोळ : पाटकुल ता मोहोळ येथील कालवा फुटून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व "भीमा" चे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी सोमवारी पाहणी केली व शेतकऱ्यांना दिलासा दिला.
रविवारी पहाटे साडेपाच वाजता पाटकुल हद्दीत उजनीचा डावा कालवा किलोमीटर 113 जवळ फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या द्राक्ष, डाळिंब, केळी बागा पाण्यात गेल्या आहेत. ऊस, टोमॅटो, गहू आधी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, माती खरडून गेली आहे. शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.
दरम्यान नुकसानीची पाहणी करण्यासाठी "भीमा" चे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. खा. धनंजय महाडिक यांच्या पर्यंत हा विषय पोहोचविला असून जास्तीत जास्त व लवकर नुकसान भरपाई कशी देता येईल या बाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनीही घटना स्थळाला भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेतली. अधिकाऱ्यांना त्यांनी काही मार्गदर्शक सूचनाही केल्या. दरम्यान नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
यावेळी पांडुरंग ताटे, राजू बाबर, बिभीषन वाघ, किसन जाधव, भिमाचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, कालवा विभागाचे अभियंता रमेश वाडकर ,सरपंच शिवाजी भोसले, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत चवरे, शंकर वाघमारे, तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, विजय कोकाटे आधी सहन शेतकरी उपस्थित होते.