Solapur: सूक्ष्म नियोजन न झाल्यास पाण्याचा अपव्यय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ujani dam

सोलापूर : सूक्ष्म नियोजन न झाल्यास पाण्याचा अपव्यय

sakal_logo
By
राजाराम माने

केतूर : सोलापूरसह, पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण १०० टक्के नव्हे तर १०८ टक्के भरले आहे. म्हणजेच १२२ टीएमसी पाणी साठवले आहे. मात्र यापैकी केवळ ६० टीएमसी पाणी उपयुक्त पाणीसाठा असतो. पण धरण १११ टक्के झाल्यावर उजनीत १०० टक्के पाणी असेल तर ५३.५३ टीएमसी उपयुक्त साठा असतो. संपलेल्या पावसाळ्यामध्ये उजनी धरण व त्यावरील १९ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगल्याप्रकारे पाऊस झाल्याने उजनी धरण व ती १९ धरणे तुंडुब भरली आहेत. यावर्षी सूक्ष्म नियोजन झाले तरच पाण्याचा अपव्यय टळेल.

उजनी धरणात या पावसाळ्यातही १२३ पाणी साठा झाला होता. आतापर्यंत उजनी धरण २०१२ चा अपवाद वगळता सलग १४ वेळा १०० टक्के नव्हे तर १११ टक्के झाले. मात्र तेवढ्याच वेळा उजनी केवळ योग्य नियोजनाअभावी मे महिन्यादरम्यान मायनसमध्ये गेले आहे. २०१८-१९ च्या हंगामात तर नियोजनाचा पूर्ण बट्ट्याबोळ झाला होता. कालवा नदीद्वारे कसलीही मागणी नसताना दोन-दोन महिने पाणी सोडून दिले गेले होते. त्यामुळे सहा ते सात महिन्यात १११ टक्के पाण्याची वाट लावली गेली होती. मात्र गेल्यावर्षी उजनीच्या पाण्याचे नियोजन चांगले झाल्यामुळे उजनीत बऱ्यापैकी पाणी राहिले होते.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

उजनी धरणात उपयुक्त पाणी ५४ टीएमसी असताना त्याचे वाटप करताना पाणी किती आहे अन्‌ वाटप किती झाले याचे भान ना प्रशासनाला राहिले ना शासनाला. सरकार बदलले, मंत्री बदलले की प्रत्येकाचा डोळा उजनीच्या पाण्यावर असतो. त्यामुळे उपलब्ध पाण्यापेक्षा वाटप जादा होत चाललेले आहे.

उजनी आलेल्या पाण्याचे नियोजन जर काटेकोरपणे झाले तर पाणीटंचाईची वेळ कधीच येणार नाही. सोलापूरला पिण्यासाठी लागणाऱ्या केवळ अर्धा टीएमसी पाण्यासाठी जवळपास पाच ते सहा टीएमसी पाणी सोडावे लागते ते पाणी योग्य पध्दतीने, नियोजनाने सोडले तर पाण्याची भरपूर बचत होईल. नीरा नदी आणि उजनी धरणातून भीमेत व कालव्यात जवळपास ३२ टीएमसी पाणी सोडून दिले गेले. त्यापैकी नदीवरील १४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात केवळ सात टीएमसी पाणी अडवले गेले. म्हणजेच २५ टीएमसी पाणी संपूर्णतः वाया गेले. तेच पाणी साठवून ठेवण्याची गरज आहे, ठिकठिकाणी बॅरेज बांधले तर वाया जाणारे पाणी साठवले जाईल व त्याचा वापर होईल.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ Live : मॅच रंगतदार स्थितीत

१४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दारे नादुरुस्त झाल्यामुळे साठलेले सात टीएमसी पाणी पण गळतीद्वारे निघून जाणार हे नक्की.उजनीत दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ११० टक्के पाणीसाठा झाला आहे. पण याद्वारे शेतीसाठी, पिण्यासाठी, उद्योगधंद्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. पण याचे काटेकोर नियोजन होत नसल्यामुळे हे पाणी वापराऐवजी वाया जास्त जाते. आता तर ठिबक सिंचनसाठी राज्यातील आठ धरणांमध्ये उजनीचा समावेश केला आहे. म्हणजे पाण्याचा वापर शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म पध्दतीने करणे बंधनकारक आहे.

विरोधाभासाचेच चित्र

जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना उजनीच्या पाण्यासाठीच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे की नाही हे समजत नाही. असेल तर त्याचा पाठपुरावा का केला जात नाही. त्यांना या पाण्याचे नियोजन करण्याचा अधिकार नसला तरी पाटबंधारे मंत्री, पालकमंत्री, संबंधित मंत्री याच्यासमोर योग्यरितीने मांडले गेले पाहिजे. नियोजनाचे सर्व अधिकार जलसंपदामंत्री यांच्याकडे आहेत. उजनीच्या पाण्याचे नियोजन कसे करणार. त्यांनी सूचना दिल्याशिवाय पाण्याचे नियोजन होणार नाही. वाहून जाणाऱ्या पाण्याचे अगोदरच मायक्रोनियोजन केले तर किती पाणी बचत होईल हे शासनाला कधी कळणार.

ठिबक सिंचनासाठी उजनीची निवड केली ही आनंदाची गोष्ट आहे. पण आधी शासनाने हे पाळले पाहिजे. उजनीचे मायक्रोप्लानिंग स्वतः करुन शेतकऱ्यांसाठी सल्ला दिला पाहिजे नाहीतर लोकासांगे ब्रम्हज्ञान न्‌ आपण कोरडे पाषाण अशी स्थिती होईल. यासाठी उजनीच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन केले तरच उजनीची ठिबकसाठीची निवड सार्थ ठरेल.

- आबासाहेब ठोंबरे, शेतकरी, केतूर

सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्याचा कोणाचाही विरोध नाही. परंतु हे पाणी नदीद्वारे न सोडता ते बंद पाइपलाइनमधून नेण्यात यावे व या बंद पाईपलाईनचे काम त्वरित करण्यात यावे. त्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय थांबेल.

- अशोक पाटील, शेतकरी, केतूर

loading image
go to top