Solapur: काँग्रेस युवकाध्यक्षपदासाठी राजकीय नेत्यांच्या मुलांमध्येच चुरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Youth Congress
राजकीय नेत्यांच्या मुलांमध्येच चुरस

सोलापूर : काँग्रेस युवकाध्यक्षपदासाठी राजकीय नेत्यांच्या मुलांमध्येच चुरस

सोलापूर : शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या काळात ऑनलाइन मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी शहरातून १२ जण इच्छूक असून त्यात माजी युवक शहराध्यक्ष अंबादास करगुळे, माजी महापौर सुशिला आबुटे, परिवहनचे माजी पदाधिकारी बसवराज म्हेत्रे यांच्या कुटुंबातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ज्या उमेदवाराला सर्वाधिक ऑनलाइन मतदान मिळेल, तोच अध्यक्ष असे समिकरण असल्याने काँग्रेसचे ते माजी पदाधिकारी परिश्रम घेत असल्याची चर्चा आहे.

अंबादास करगुळे यांची वयोमर्यादा संपल्याने त्याठिकाणी नुतन युवकाध्यक्षासाठी मतदान घेतले जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर करगुळे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत ’राष्ट्रवादीच हा आपला खरा शत्रू असून त्यांच्या पक्षातील नाराजांना फोडून आपल्याकडे घ्या’, असे आवाहन केले होते.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ Live : मॅच रंगतदार स्थितीत

त्यानंतर सोमवारी (ता. ८) त्यांनी ’जातीवर निवडणूक होऊ नये, पारदर्शक निवड व्हावी’ असे म्हणत पक्षालाच घरचा आहेर दिला. त्यांचा मेव्हणा युवकाध्यक्षाच्या रिंगणात असून डोंगरे यांचे पारडे जड असल्याने करगुळेंनी तसे वक्‍तव्य केल्याची चर्चा आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष पदासाठी आठ-दहा वर्षे विद्यार्थी काँग्रेसची धुरा सांभाळणारे गणेश डोंगरे यांच्यासह विवेक कन्ना, झिशान सय्यद, सचिन वेरणेकर, आकाश गायकवाड, राजासाब शेख, अर्जुन साळवे, प्रशांत कांबळे, पवन दोडमणी, सचिन मानवी, सुशिलकुमार म्हेत्रे आणि प्रतिक आबुटे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
५० हजार तरुणांच्या नोंदणीचे टार्गेट
शहर काँग्रेस युवकाध्यक्षासाठी १२ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक मतदान ज्याला पडेल, तो अध्यक्ष ठरणार आहे. तरीही, प्रत्येक उमेदवाराने किमान पाच हजार सदस्यांची नोंदणी करून घ्यावी, असे टार्गेट पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना दिले आहे. शहरातील युवक काँग्रेसची ताकद वाढली असून पक्षात येणाऱ्या तरूणांचा कलदेखील मोठा आहे, हे पक्षश्रेष्ठीला दाखविण्याचा प्रयत्न त्यातून होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. दरम्यान, सुरवातीचे आठ-दहा दिवस तुम्ही युवकाध्यक्ष पदासाठी सदस्य नोंदणी करा, मी आल्यानंतर २० नोव्हेंबरला बैठक घेऊन पुढील नियोजन करु, असा सल्ला १२ इच्छूक उमेदवारांना आमदार प्रणिती शिंदे यांनी दिल्याचीही चर्चा आहे.

loading image
go to top