

सोलापूर : शाळेत कायमचा मुख्याध्यापक येण्यासाठी किमान १५१ पटसंख्या बंधनकारक आहे. द्विशिक्षकी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमीच असते. २०२१-२२ च्या संचमान्यतेनुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या तब्बल एक हजार ७३९ शाळांना कायमचा मुख्याध्यापकच नसल्याची बाब समोर आली आहे.
आता २०२२-२३ ची संचमान्यता होणार असून त्यात आणखी १५ ते २० शाळांची भर पडेल, अशी स्थिती आहे. इंग्रजी, सेमी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा ग्रामीण भागातील पालकांचाही कल वाढत आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांसमोर पटसंख्या टिकवणे आणि अतिरिक्त होण्यापासून स्वत:चा बचाव करणे याचे मोठे आव्हान आहे. ऐकेकाळी सोलापूर जिल्हा परिषदे दोन हजार ७९८ शाळांची पटसंख्या अडीच लाखांपर्यंत होती.
पण, मागील काही वर्षांत दोन लाखांची पटसंख्या पार करताना अधिकाऱ्यांसह शिक्षक-मुख्याध्यापकांना घाम गाळावा लागतोय ही वस्तुस्थिती आहे. १० आणि २० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या वाढत असून त्याठिकाणी विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक जास्त आहेत.
तर जिल्ह्यातील बऱ्याच शाळांमध्ये पटसंख्या जास्त आणि शिक्षक कमी, अशी स्थिती आहे. तसेच काही ठिकाणी शाळांची पटसंख्या वाढीला वाव असतानाही तसा प्रयत्न होताना दिसत नाही, अशीही चर्चा आहे.
इंग्रजी, गणित व विज्ञान विषय जमले की मुलाला पुढील शिक्षण सोपे जाईल, तो विज्ञान शाखेतून उच्च शिक्षण घेऊन नोकरीला लागेल या हेतूने ग्रामीण भागातील पालक देखील आता मुलांना इंग्रजी व सेमी इंग्रजी शाळांमध्ये घालत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये तशा शिक्षणाची गरज व्यक्त केली जात आहे.
मुख्याध्यापक पद टिकविण्यासाठी काही शिक्षकांची अशी ‘शाळा’
जिल्हा परिषदेच्या काही शाळांची पटसंख्या १४० ते १४५ पर्यंत आहे. त्या गावात, वाड्या-वस्त्यांवर प्रयत्न केल्यास निश्चितपणे पाच ते दहा विद्यार्थी वाढतील, असा विश्वास शिक्षकांना आहे. पण, पटसंख्या १५० पेक्षा जास्त झाली तर आपल्याला मुख्याध्यापक म्हणून रूबाब दाखवता येणार नाही.
दुसऱ्या आलेल्या ‘कायम’ मुख्याध्यापकाच्या हाताखाली काम करावे लागेल म्हणून त्यांच्याकडून पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न होत नाहीत, मुख्याध्यापक पद टिकविण्यासाठी काही गुरुजी अशी ‘शाळा’ करत असल्याची अनेक उदाहरणे असल्याचे बोलले जात आहे.
झेडपी शाळांची सद्य:स्थिती
एकूण शाळा : २,७९७
पटसंख्या : २.०२ लाख
मुख्याध्यापकासाठी पटसंख्या : १५१
अंदाजे प्रभारी मुख्याध्यापक : १,७३९
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या विविध उपक्रमांमुळे शाळांमधील पटसंख्या वाढीला मोठी मदत झाली आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांनीही त्यासाठी परिश्रम घेतले. आता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता दोन-तीन दिवसात सुरु होईल. त्यानंतर रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकांची संख्या समजेल.
- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.