
सोलापूर : मजुरीच्या दरवाढीत रोबोट बनला शेतकऱ्यांचा परममित्र
सोलापूर : शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याला सातत्याने नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. पिकांचे जतन करताना तो दिवस-रात्र संकटांना झेलत असतो. आता शेतीकामांची मजुरीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबातील पूनम माळी व प्रियांका जेऊरे या दोघींनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक रोबोट बनविला. माणसांप्रमाणे तो तेवढ्याच वेगाने टोमॅटो तोडतो. चांगली व खराब टोमॅटो वेगवेगळ्या टोपलीत ठेवतो.
ए. जी. पाटील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या पूनम व प्रियांका या दोघींच्या घरी शेती आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, कष्ट त्यांना जवळून माहिती होते. त्यावेळी त्यांनी एकत्रित येऊन भाजीपाला वर्गीकरणासाठी सुधारित प्रगत रोबोट आर्म तयार केला. त्या मुलींची कल्पना सत्यात उतरावी म्हणून पूनम व प्रियांका यांना प्रा. शारदा कटके यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. टोमॅटो उत्पादकांना पीक काढताना कुशल कामगारांची कमतरता, मजुरीत वाढ आणि हाताने फळ काढताना होणारे नुकसान, तोडण्याची दीर्घ प्रक्रिया, पिकातील काटेरी झाडे आणि सरपटणारे प्राणी यांचा धोका, यावर त्या दोघींनी ठोस उपाय शोधला.
टोमॅटो पिकर रोबोटचा वापर हा आधुनिकीकरण शेतीमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विकसित रोबोट पुरेसे पिकलेले टोमॅटो काढतो. कोणतेही नुकसान न करता, कच्च्या टोमॅटोला सोडतो. शिवाय, रोबोट पिकलेले टोमॅटो कलर सेन्सरद्वारे ओळखतो. त्यानंतर रोबोट पिकलेले टोमॅटो निवडतो आणि बास्केटमध्ये ठेवतो. रोबोटमध्ये अतिरिक्त वैशिष्ट्ये असे, की पिकलेले आणि कुजलेले टोमॅटो एका वेगळ्या टोपलीत ठेवतो. हा प्रकल्प तयार करताना संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सचिव एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील व उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. आर. व्ही. दरेकर यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे पूनम व प्रियांकाने सांगितले.
सहा-सात महिन्यांत तयार केला
टोमॅटो पिकर रोबोट
रोबोटला दोन हात आहेत
प्रकल्पासाठी सहा-सात
हजारांपर्यंत खर्च
बॅटरीवर चालतो रोबोट
माणसांप्रमाणेच वेगाने टोमॅटो तोडतो
८० टक्के बकेट भरल्यानंतर अलार्म वाजतो आणि मोबाईलवर मेसेज येतो
Web Title: Solapurrobot Becomes Friend Farmers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..