शेतकऱ्याने दिला महावितरणला शॉक ! उपोषणाचे हत्यार उपसताच दोन दिवसांत जोडणी देण्याचे आश्वासन 

mahavitaran
mahavitaran
Updated on

मोहोळ (सोलापूर) : गेल्या पंधरा वर्षांपूर्वी विद्युत पंपाच्या जोडणीसाठी कोटेशन भरूनही विद्युत जोडणी न मिळाल्याने पेनूर (ता. मोहोळ) येथील शेतकरी मारुती सुदाम रणदिवे (वय 60) यांनी मोहोळ येथील विद्युत महावितरणच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, शेतात विद्युत जोडणी मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका वयोवृद्ध शेतकऱ्याने घेतल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना शौकच बसला, त्यांची मोठी अडचण निर्माण झाली. या घटनेची दखल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील यांनी घेऊन उपोषणाला पाठिंबा दिला. दरम्यान, आपण उद्यापासूनच रणदिवे यांच्या कामाला सुरवात करीत आहोत, असे आश्वासन मोहोळ येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता हेमंत ताकपेरे यांनी दिल्याने शेतकऱ्याने उपोषण तूर्त स्थगित केले. 

यासंदर्भात माहिती अशी, की पेनूर येथील शेतकरी मारुती रणदिवे यांनी 2005 मध्ये तीन अश्‍वशक्तीच्या विद्युत पंपासाठी वीज जोडणी मिळावी म्हणून महावितरण विभागाकडे अर्ज दिला. महावितरणच्या नियमाप्रमाणे कोटेशनही भरले. हा शेतकरी अशिक्षित आहे. त्याने वेळोवेळी संबंधित विभागाकडे हेलपाटे मारले, विनंत्या केल्या मात्र त्यांची कोणीही दखल घेतली नाही. उलट त्यांना उद्धटपणाची भाषा वापरून घरचा रस्ता दाखवला. प्रत्येक वेळी त्या शेतकऱ्याला अधिकारी रिटायर झाले आहेत, तुमचे कोटेशन जुने आहे, ते चालत नाही, ऑनलाइन नाव दिसत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची वेळोवेळी बोळवण केली. पेनूर कार्यालयात गेल्यास मोहोळ कार्यालयात जाण्यास सांगितले जाते तर मोहोळ कार्यालयात गेल्यावर पेनूर कार्यालयात जाण्यास सांगितले जात होते. 

दरम्यान, यासाठी रणदिवे यांनी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे हेलपाटे मारले; मात्र न्याय मिळाला नाही . अखेर सोमवारी (ता. 21) पासून मोहोळ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर रणदिवे यांनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाचे हत्यार उपसताच संबंधित अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली. मोहोळ येथील अभियंता हेमंत ताकपेरे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याशी संपर्क साधला व अडचण सांगितली. त्यानंतर ताकपेरे यांनी दोन दिवसांतच तुमच्या कामाला सुरवात करतो, असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्याने उपोषण मागे घेतले. 

येत्या आठवडाभरात संबंधित शेतकऱ्याला वीजजोडणी न दिल्यास आम्ही संघटनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील यांनी सांगितले. या वेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com