दुबार अन्‌ उशिरा पेरणीचे संकट! ५० टक्क्यांपेक्षा कमी खरीपातील पेरण्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेलु, परभणी परिसरात पावसाची दडी
दुबार अन्‌ उशिरा पेरणीचे संकट! ५० टक्क्यांपेक्षा कमी खरीपातील पेरण्या

दुबार अन्‌ उशिरा पेरणीचे संकट! ५० टक्क्यांपेक्षा कमी खरीपातील पेरण्या

सोलापूर : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, माढा, बार्शी, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस व मंगळवेढा, या तालुक्यांमध्ये एकूण क्षेत्राच्या ५० टक्केसुध्दा पेरण्या झाल्या नाहीत.

जिल्ह्यात सोयाबीन, तूर, मका, उडीदाची पेरणी होत आहे. अजूनही जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार हेक्टरवर पेरणी झालेली नाही. शेतकऱ्यांना जूनमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा होती. पण, जून महिन्यात पावसाने ओढ दिली. आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाची आशा होती. पण, अजूनपर्यंत जिल्हाभर समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मागच्या वर्षी जुलै महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता, पण यंदा पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी अद्याप मायनसमध्येच आहे. पुणे जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला नाही. एकूणच आता पेरणीसाठी किंवा बियाणे उगविण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

बळीराजाच्या आभाळाकडे नजरा

जून संपला, आता जुलैचा पहिला आठवडाही संपतोय, तरीदेखील आठ तालुक्यांमध्ये पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे एकूण क्षेत्राच्या ४५ टक्केसुध्दा त्या तालुक्यांमध्ये झालेली नाही. जिल्ह्यात खरीपाचे दोन लाख ३४ हजार ६४१ हेक्टर क्षेत्र आहे. ४ जुलैपर्यंत त्यापैकी एक लाख एक हजार ४२९ हेक्टरवर बियाणांची पेरणी झाली आहे. पण, आता पेरलेल्या बियांच्या उगवणी तथा वाढीसाठी आणि उर्वरित क्षेत्रांवर पेरणी करण्यासाठी पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.

दुबार अन्‌ उशिरा पेरणीचे संकट

मागील वर्षी ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात १४०.१ मिलीमीटर पाऊस झाला होता. पण, यंदा ९३.७० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा ४७ मिलीमीटर पाऊस कमी झाल्याने जमिनीतील ओलावा कमी होत आहे. अनेकांनी पावसाच्या आशेवर पेरणी केली, पण पावसाने ओढ दिल्याने त्या क्षेत्रावर दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येईल, अशी स्थिती आहे. दुसरीकडे १५ जुलैपर्यंत पेरणी १०० टक्के होणे अपेक्षित आहे. पण, अजूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ४३ टक्केच पेरणी झाली असून पावसाच्या खंडामुळे उशिराने पेरणी करावी लागणार आहे.

Web Title: Sowing Less Than 50 In 8 Talukas Of Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..