
Solapur News : मुलीच्या लग्नासाठी पाचशे रुपये बचतीवर मिळवा अडीच लाख रुपये
सोलापूर : एक वर्षाच्या मुलीसाठी पालकांनी केवळ ५०० रुपये महिना पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवून केवळ ९० हजार रुपयांच्या बदल्यात या मुलीला लग्नाच्या वेळी पालकांना २ लाख ५५ हजार रुपये मिळतात. सर्वाधिक व्याजदर असलेल्या या योजनेबाबत जिल्ह्यात टपाल खात्याच्या वतीने गुरुवार (ता. ९) पासून पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजनेसाठी विशेष अभियान राबवले जाणार आहे.
टपाल खात्याकडून ही योजना जाहीर झाल्यापासून त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. मुलीच्या जन्मासाठी पालकांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने ही योजना राबवली जाते. मुलींच्या पालकांनी या योजनेत सहभाग घेतल्यानंतर योग्य कालावधीनंतर मुलीचे शिक्षण व योजनेच्या परिपक्वतेचा लाभ लाभार्थीला मिळतो.
मुलीच्या शिक्षणाचा आर्थिक भार कमी व्हावा यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते. वर्ष २०१५ पासून या योजनेची सुरवात झाली आहे. या योजनेतील ठेव रकमेवर सर्वाधिक व्याजदर दिला जातो. जिल्ह्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५९ हजार पालकांनी योजनेत सहभाग घेतला आहे.
ठळक बाबी
जिल्ह्यात एकूण सुकन्या योजनेची खाती ५९ हजार
एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ अखेर पर्यंतची खाती ५ हजार
दोन मुलींच्या नावाने खाते उघडता येते
विशेष मोहिमेचा कालावधी गुरुवार (ता.९) व शुक्रवार (ता.१०)
शिक्षणासाठी अर्धी रक्कम पाच वेळा काढण्याची सुविधा
मुलीच्या वयाच्या १८ व्या वर्षी अर्धी रक्कम काढता येते
मुलीच्या लग्नाच्या एक महिना आधी रक्कम मिळते
मुलीच्या लग्नानंतर तीन महिन्याने मॅच्युरीटी रक्कम काढता येते
केंद्राच्या इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक व्याजदर
दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास खाते काढता येते
योजनेस आयकर सवलत
लागणारी कागदपत्रे
मुलीचा जन्मदाखल्याची प्रत
पालकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड
दोन पासपोर्ट फोटो
सोलापूर येथील प्रधान डाकघराच्यासह विभागातील २०५ डाकघर शाखांकडून गुरुवार (९) पासून पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजनेच्या सहभागासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
- मुकुंद बडवे, प्रवर अधीक्षक, सोलापूर