
सोलापूर : महागाई झाकण्यासाठी धार्मिक भांडण
सोलापूर - भाजपाने धार्मिक भांडणे लावत आर्थिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा उद्योग भाजप, रास्वसंघ परिवाराने चालवला आहे. कारण महागाई व इंधन दरवाढ तर सर्वांचा जीवन मरणाचा प्रश्न बनली आहे. पण मोदी सरकार केवळ कॉर्पोरेट घराण्याचे भले करण्याच्या पाठीमागे लागले आहे अशी टीका माकपाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी पत्र परिषदेत केली आहे. दत्त नगरातील माकपाच्या कार्यालयात श्री. नारकर यांची सद्य राजकीय स्थितीवर पत्र परिषद झाली.
केंद्र सरकारने श्रीलंकेसारखी स्थिती भारताची करून ठेवली आहे. या सरकारच्या काळात अंबानीची मालमत्ता ३५० टक्क्यांनी वाढली तर अदानीची मालमत्ता ७५० टक्क्यांनी वाढली आहे. देशाची ५२ टक्के संपत्ती या घराण्याकडे दिली आहे. तसेच याच घराण्याची ४० चॅनल असल्याने त्यांनी माध्यमावर कब्जा केला आहे. कोणत्याही देशाची आत्मनिर्भरता ही त्या देशाच्या सार्वजनिक उद्योगावर असते. पण हे उद्योगच अदानी व अंबानीच्या हाती देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे.
देशात इंधन दरवाढीसह महागाई शिगेला पोहोचली आहे. पण आर्थिक संकट व महागाईच्या असंतोष होऊ नये म्हणून मंदिर व मशिदीची भांडणे उकरून काढली जात आहेत. धार्मिक स्थळे स्वातंत्र्याचा वेळी जशी होती तशीच ठेवावी असा कायदा असताना ज्ञानवापी चे भांडण उकरले आहे. राजकीय पक्षाच्या निधीबद्दल गोपनियतेचा कायदा णून भाजपाला जमा झालेले निधी लपवला जात आहे. देशातील सर्व जनतेचे महागाईचा व बेकारीच प्रश्न एकच असल्याने त्याबद्दलचा असंतोष लपवण्याचे काम होत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, जिल्हा सचिव एम.एच.शेख, अनिल वासम, सिध्दप्पा कलशेट्टी, प्रा. अब्राहम कुमार, रंगप्पा म्हेत्रे, शंकर म्हेत्रे आदी उपस्थित होते.
दारुप्रमाणे इंधनाचे दर कमी करावेत
यावेळी पत्रकारांनी कर्नाटक सरकारने इंधनावरील कर कमी केल्याबद्दल विचारणा केली असता राज्य सरकार दारूचे दर कमी करू शकते. तर इंधनावरील कर का कमी करु शकणार नाही. केवळ राजकीय इच्छा शक्तीने राज्य सरकार महागाईत इंधन करकपातीचा दिलासा देऊ शकते असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.