esakal | "रासेयो'च्या विद्यार्थ्यांचे पथदर्शी कार्य ! आपत्कालीन परिस्थितीत भगतवस्तीशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडला
sakal

बोलून बातमी शोधा

Raseyo

शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कोळेगावातील अतिवृष्टीने बाधित बंधारा श्रमदान करून वाहतुकीस खुला केला. त्यामुळे भगतवस्तीशी (मळोली, ता. माळशिरस) तुटलेला संपर्क पुनःप्रस्थापित झाला असून, विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत केलेले हे कार्य आदर्शवत ठरले आहे. 

"रासेयो'च्या विद्यार्थ्यांचे पथदर्शी कार्य ! आपत्कालीन परिस्थितीत भगतवस्तीशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडला

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कोळेगावातील अतिवृष्टीने बाधित बंधारा श्रमदान करून वाहतुकीस खुला केला. त्यामुळे भगतवस्तीशी (मळोली, ता. माळशिरस) तुटलेला संपर्क पुनःप्रस्थापित झाला असून, विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत केलेले हे कार्य आदर्शवत ठरले आहे. 

माळशिरस तालुक्‍यातील पिलीव, मळोली, तोंडले-बोडले आदी गावांत अतिवृष्टी झाली. अचानक झालेल्या मोठ्या पावसामुळे गावातील ओढ्यांनी रोद्ररूप धारण केले. ओढ्याच्या पुराच्या पाण्याने गावातील अनेक घरे, जनावरांचे गोठे, जनावरे, शेतातील उभी पिके स्वतःच्या कवेत घेतली. रस्ते व बंधारे पाण्याखाली गेले. ही भयानक अवस्था पाहून आपत्कालीन परिस्थितीत आपण धावून गेले पाहिजे, या हेतूने शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे श्रीपूर, वेळापूर, अकलूज, तांदूळवाडी, चाकोर, मळोली येथील रहिवासी असणारे विद्यार्थी नागनाथ साबळे, सूर्याजी लावंड, सचिन बनसोडे, वैभव गुजर, प्रशांत वाघमारे, शुभम हेंद्रे, गणेश भोसले, अंकुश प्रक्षाळे आदींनी एकत्र येऊन मिळेल त्या वाहनाने मळोली गाव गाठले. 

मळोली गावाच्या पूर्वेकडील बंधारा व त्यावरील रस्ता बंद होता. पुराच्या पाण्यामुळे काटेरी झाडेझुडपे अडकलेली होती. त्यामुळे भगतवस्तीशी संपर्क तुटला होता. हे तरुण विद्यार्थी कामाला लागले. सोबत काही गावकऱ्यांनाही घेतले. झाडेझुडपे तोडून बाजूला काढून बंधारा पूर्ववत करत वाहतुकीयोग्य करीत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. 

वास्तविक, राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दरवर्षी 24 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर हा "कार्य प्रसिद्धी सप्ताह' म्हणून पाळला जातो. या सप्ताहात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा, श्रमदान व विविध समाजकार्ये करून घेतली जातात. तसेच श्रमदान शिबिरेही आयोजित केली जातात. यावर्षी कोरोनामुळे हा सप्ताह नसला तरी विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रशेखर ताटे, प्रा. दादासाहेब कोकाटे, डॉ. चंकेश्वर लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंप्रेरणेने हे समाजकार्य केले आहे. गतवर्षी झालेल्या सप्ताहात निबंध लेखन, रांगोळी, घोषवाक्‍य आदी स्पर्धा, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, एक दिवसीय नेतृत्व विकास कार्यशाळा, पथनाट्य व भारूड सादरीकरण व श्रमदान आदींचे आयोजन केले होते. शिवकन्या सखुबाई महादजी निंबाळकर स्मारक जीर्णोद्धार प्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रमदान केले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व कार्यक्रमांस संस्थाध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, संचालक संग्रामसिंह मोहिते-पाटील, सिनेट सदस्या स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजित रणवरे आदींचे मार्गदर्शन लाभते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top