
Solapur : स्मशानभूमीतील शांततेमुळे अभ्यासात एकाग्रता
सोलापूर- परीक्षा जवळ आली की विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी आपल्याला आवडेल असे ठिकाण निवडतात. काही विद्यार्थी शाळा, महाविद्यालयातील अभ्यासिका, वाचनालये तर काही विद्यार्थी बगीचा व उद्याने येथे अभ्यास करतात. परंतु, काही विद्यार्थी अंधश्रद्धेला व मनातील भीतीला थारा न देता अभ्यास करण्यासाठी स्मशानातील शांततेला प्राधान्य देत आहेत.
सोलापूरचे आराध्य दैवत रुपाभवानी मंदिरा जवळील लिंगायत स्मशान भूमी ही शहरातील इतर स्मशानभूमीपेक्षा सोयीसुविधांनी युक्त आहे. येथील व्यवस्थापनाने स्मशानभूमीत वेगवेगळ्या प्रकारची झाडे लाऊन नियोजनबद्ध विकास केलेला आहे.
या झाडांच्या सावलीत व अंत्यसंस्कारासाठी आलेल्या माणसांना बसण्यासाठी बनविलेल्या शेडखाली विद्यार्थी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अभ्यासात मग्न झाल्याचे पाहायला मिळते. येथे पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध आहे. याचाही फायदा विद्यार्थ्यांना वेळेची बचत करण्यासाठी होतो. या स्मशानभूमीच्या जवळच काही नामवंत महाविद्यालये आहेत.