Solapur : खा.सुळेचा पहिलाच मंगळवेढा दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule

Solapur : खा.सुळेचा पहिलाच मंगळवेढा दौरा,

मंगळवेढा : पोटनिवडणूकीतील निसटत्या पराभवाने ढासळलेल्या बुरुजाला अध्यक्ष शरद पवाराच्या सोलापूर दौय्राने राष्ट्रवादीला बुस्टर डोस मिळणार काय ? हे वृत्त नुकतेच ई सकाळ ने प्रसिद्ध केले.त्यानंतर आ.रोहित पवारांचा पंढरपूर दौरा झाला तर आज राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे या पहिल्यादांच मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्यात श्री संत दामाजी,चोखोबा, कान्होपात्रा,या समाधी स्थळाला भेट देणार असल्याची सांगीतले असले 2024 च्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

राज्यात भाजपा सत्तेत असताना मंगळवेढा नगरपलिकेवर 2016 ला राष्ट्रवादीचा थेट नगराध्यक्षा अरूणा माळी झाल्या.2019 च्या विधानसभा निवडणूकीत स्व भारत भालके यांच्या रुपाने राष्ट्रवादीला 10 वर्षानंतर आमदार मिळाला होता.पण विठठल कारखान्याच्या व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी झालेल्या धावपळीत स्व. भालकेच्या आजाराने डोके वर काढले त्यात त्यांचे निधन झाले त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत भगीरथ भालके यांना निसटता पराभव स्विकारावा लागला.मतदारसंघाच्या पालकत्वाची जबाबदारी घेतलेल्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही दुर्लक्ष केले राज्यात सत्ता असताना राष्ट्रवादीला या मतदारसंघावर पकड ठेवता येईना. सत्ताबदलाचा फारसा परिणाम ही या मतदारसंघात झाला नाही मात्र राष्ट्रवादीचा पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक यांच्यातील अंतर वाढू लागले.

नुकत्याच झालेल्या दामाजी कारखान्याच्या निवडणूकीत दुसय्रा गटाचा आधार घेत कारखान्यावरील सत्ता मिळविली. मतदारसंघात सध्या भोसे, आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहेत, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न देखील पावसाळी अधिवेशनानंतरही मुख्यमंत्र्याच्या दरबारी अडकला.बसवेश्वर स्मारकाची घोषणाच झाली. तो प्रश्न देखील रखडलेला आहे टेंभुर्णी विजयपूर व नागपूर रत्नागिरी महामार्गामुळे मंगळवेढ्याचे नाव महामार्गाच्या नकाशावर आले मात्र इथली संतसष्टी पाहण्याच्या दृष्टीने पर्यटनाच्या संधी वाढवणे दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, याशिवाय अन्य रखडलेल्या प्रश्नावर रान उटवण्याची राष्ट्रवादीला संधी आहे परंतु नेत्यासमोर दिसणारे कार्यकर्तेच राष्ट्रवादीत अधिक झाल्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन कोण करणार ? हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करताना दिसत नाही किंबहुना त्या प्रश्‍नासाठी आंदोलन करतानाही दिसत नाही.सत्तेचा गुळ संपल्याने अनेक कार्यकर्त्यानी अंतरावर राहण्याची भूमिका घेण्यास सुरुवात केली.

2019 च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादीची बांधणी पवाराच्या सोलापूर दौय्राने झाली. हा दौरा सोलापूरसह राज्यातील तरुणाला प्रेरणा देणारा ठरला सध्या जिल्हयात भाजप लोकप्रतिनिधी जास्त असल्याने केंद्रातील राज्यातील सत्तेचा लाभ घेताना पक्षबांधणी नेटाने करत असताना राष्ट्रवादीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मात्र स्मशान शांतता आहे.त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा घडयाळाचा गजर वाजणे अडचणीचे ठरणार आहे.या मतदार संघात दामाजीच्या निवडणुकीनंतर मंगळवेढ्यातील बहुतांश राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी इतराशी सलगी वाढवली. या मतदार संघाची जबाबदारी आ. रोहित पवार यांच्याकडे दिली होती मात्र त्यांनी देखील या मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी अद्याप वेळ दिला नसल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आ.रोहीत पवारांनी पंढरपूर दौरा केला.तर खा. सुळे या मंगळवेढा दौऱ्यावर येऊ लागल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा.सुळे यांची भेट ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

त्या सोलापूर येथून दु.12 वाजता मंगळवेढा येथे येणार असून शहरातील संत कान्होपात्राच्या समाधीला भेट देऊन 12.15 वाजता राष्ट्रवादीचे राहुल शहा यांच्या घरी भेट देऊन दुपारी 12.30 ते एक या दरम्यान दामाजीपंत व चोखामेळा या समाधी स्थळाला भेट दिल्यानंतर त्या पंढरपूरला मार्गस्थ होणार आहेत. एकेकाळी शरद पवार बोले, मंगळवेढा हाले अशी परिस्थिती होती मंगळवेढ्यातील तीन पिढ्याचे शहा कुटुंब निष्ठावान मानले जातात.भविष्यात गमावलेली जागा पुन्हा मिळविण्याच्या दृष्टीने कोणता कानमंत्र राहुल शहा यांच्या निवासस्थानी होणाऱ्या भेटीत कार्यकर्त्यांना देतात याकडे लक्ष लागले.