
Crime News : तरुणाकडून ‘एटीएम’ची अदलाबदल; बँक खात्यातून लांबवले ९० हजार रुपये
सोलापूर : अशोक चौकातील ‘एसबीआय’ बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढताना मागे उभारलेल्या तरुणाने मिनी स्टेटमेंट काढायला सांगून एटीएमचा पासवर्ड जाणून घेतला. त्यानंतर एटीएम कार्डची अदलाबदल करून त्याने ९० हजार रुपये लंपास केल्याची फिर्याद नवनाथ सुग्रीव चिट्टमपल्ली (रा. कोटा नगर, जुना विडी घरकूल) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. दरम्यान, फिर्यादी चिट्टमपल्ली हे सोमवारी (ता. १२) रात्री पावणेआठच्या सुमारास अशोक चौकातील ‘एसबीआय’च्या एटीएम सेंटरवर गेले होते. पैसे काढताना त्यांच्यामागे एक तरूण उभा होता. त्याने पहिल्यांदा मिनी स्टेटमेंट काढायला सांगितले. पासवर्ड टाकून मिनी स्टेटमेंट काढताना त्या तरुणाने फिर्यादीचा पासवर्ड पाहिला. हातचलाखी करून त्याने एटीएम कार्डची अदलाबदल केली. स्वत:च्या जवळील दुसरेच कार्ड त्यांना दिले.
मशिनमध्ये पैसे नाहीत, तुम्ही दुसरीकडून पैसे काढा, असे सांगून त्याने फिर्यादीला तेथून जायला भाग पाडले. त्यानंतर त्या तरुणाने फिर्यादी चिट्टमपल्ली यांच्या एटीएममधील ९० हजार रुपये काढून घेतले. चिट्टमपल्ली यांच्या फिर्यादीवरून त्या तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक हणमंत बादोले तपास करीत आहेत.
‘सीसीटीव्ही’त अंधूक चेहरा
फिर्यादी चिट्टमपल्ली यांच्या मागे एक तरुण उभा असलेला सीसीटीव्हीत दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा अंधूक दिसत आहे. तरीपण त्यावेळचे फुटेज मिळावे म्हणून पोलिसांनी बॅंकेला पत्रव्यवहार केला आहे. चोरटा लवकरच सापडेल, असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.