
सोलापूर : जिल्ह्यातील १७४ गावांत जलजीवन मिशनची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, त्यापैकी २२ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांची वणवण थांबावी, यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे. मात्र, २३६ कोटी रुपये खर्चूनही योजना पूर्ण झालेल्या गावांमध्ये उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने यातून येत्या काळात होणाऱ्या योजना पूर्ण झाल्यानंतरही प्रत्येक घराला स्वच्छ, नियमित व पुरेसे पाणी मिळण्याचा उद्देश मृगजळच ठरण्याची चिन्हे आहेत.
२०१९ मध्ये केंद्र सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांना प्रतिव्यक्ती ५५ लिटर शुद्ध पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन योजना सुरू केली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोट्यवधी रुपये खर्चून १७४ कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील २२ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जलस्त्रोतांची अयोग्य निवड हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे कामे पूर्ण होऊनही टंचाई निर्माण झालेल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळा तोंडावर आल्याने आणि मुदत संपूनही ३५० कामे अपूर्ण असल्यामुळे उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून योग्य पावले उचलली जात असली तरीही योजना पूर्ण झालेल्या गावांतील टंचाई स्थिती पाहता सर्व कामे मार्गी लागल्यावरही टंचाई दूर होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण जनतेला शुद्ध, नियमित व पुरेसे पाणी मिळेल, हे मृगजळ ठरण्याची शक्यता आहे.
गतवर्षी मे महिन्यात जिल्ह्यात ३९८ टँकर होते. यंदा १९३ टँकर सुरू आहेत. जलजीवन योजनेचा स्रोत विहीर आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी अडीच मीटरने कमी झाली आहे. त्यामुळे योजना पूर्ण झालेल्या गावांतही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. केवळ अपुऱ्या स्त्रोतांमुळे टंचाई निर्माण झाली आहे.
- सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा जिल्हा परिषद, सोलापूर
आज दुपारी पाणीपुरवठा विभागाची बैठक
जलजीवनची उर्वरित कामे मे अखेर पूर्ण न झाल्यास ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी ठेकेदार तक्रारी घेऊन जिल्हा परिषदेत आले होते. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे रजेवर असल्याने त्यांना परतावे लागले. ते शनिवारी (ता. २५) त्यांची भेट घेणार आहेत. तर दुपारी एक वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक बोलावली आहे. त्यात वेळेत कामे पूर्ण न झालेल्या कामांना मुदतवाढ देणे अथवा ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय होणार आहे.
योजनेवर एक दृष्टिक्षेप (निधी कोटीत)
पहिल्या टप्प्यात मंजूर कामे ८५५
मंजूर निधी ८३७
पूर्ण झालेली कामे १७४
खर्च झालेला निधी २३६
मुदत संपूनही अपूर्ण कामे ३५०
चौकशी सुरू असलेली कामे १८९
दुसऱ्या टप्प्यात मंजूर कामे १५४
पूर्ण झालेली कामे १३
आणखी मिळालेला निधी २२
जुनी पाणीपुरवठा योजनाही विहिरीवर होती. उन्हाळ्यात टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने व्होळे २७ गावांची योजना राबविण्यात आली. मात्र, सीना-माढा सिंचन योजना आल्यावर संबंधित गावांना त्याची गरज न उरल्याने ती बंद पडली. आता जलजीवनचीही योजना बोचरे तलावानजीक विहीर घेऊन राबविण्यात आली. त्याचे पाणी आटल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सीना-माढा योजनेत गावाचा समावेश करून पाणी बोचरे तलावात सोडल्यास पाणीटंचाई दूर होऊ शकते.
- डॉ. शरद मोरे, सरपंच, तुळशी, ता. माढा
योजना पूर्ण होऊनही टँकर सुरू असलेली तालुकानिहाय गावे
माळशिरस : कोथळे, लोंढे मोहितेवाडी, माढा : तुळशी, बावी, बैरागवाडी, जाधववाडी मो., करमाळा : घोटी, वरकुटे, केम, आळजापूर, मंगळवेढा : सोड्डी, खवे, पाटखळ - मेटकरवाडी, हुलजंती, दक्षिण सोलापूर : इंगळगी, सांगोला : सोनलवाडी, बागलवाडी, चिकमहुद, चिणके, हणमंतगाव, बार्शी : धोत्रे, वानेवाडी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.