esakal | पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ! शनिवारी होणार 524 केंद्रांवर मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

evm

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ! शनिवारी होणार 524 केंद्रांवर मतदान

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. 17) सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक निर्भय, नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एक लाख 78 हजार 190 पुरुष मतदार व 1 लाख 62 हजार 694 स्त्री मतदार तसेच इतर 5 असे एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार आहेत. मतदारसंघात 524 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यामध्ये 328 मूळ मतदान केंद्र 196 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांसाठी 524 कंट्रोल युनिट, 1048 बॅलेट युनिट व 524 व्हीहीपॅट मशिन असणार आहेत. तसेच 210 कंट्रोल युनिट, 420 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

निवडणुकीसाठी 2 हजार 552 अधिकारी- कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कर्मचारी व मतदान साहित्य वाहतुकीसाठी 94 एसटी बस व तीन जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसा वीज पुरवठा, शौचालये, दिव्यांगांसाठी रॅमची सुविधा करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात येत आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गुरव यांनी दिली.