esakal | सोलापूर शहरात 2, 8 आणि 9 मे रोजी कडक संचारबंदी

बोलून बातमी शोधा

LOCKDOWN
सोलापूर शहरात 2, 8 आणि 9 मे रोजी कडक संचारबंदी
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, विषाणूची साखळी खंडीत व्हावी या हेतूने 15 मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु, शहरातील रूग्णसंख्या वाढत असतानाच मृत्यूदरही वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात दर शनिवारी व रविवारी कडक निर्बंध पाळले जातील. 2 मे आणि 8 व 9 मे रोजी वैद्यकीय सुविधांशिवाय अन्य कोणत्याही आस्थापना चालू राहणार नाहीत, असे आदेश महापालिका आयुक्‍त पी. शिवंशकर यांनी काढले आहेत.

कडक संचारबंदीतही बेशिस्तपणे वावरणाऱ्यांची संख्या शहरात लक्षणीय आहे. शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिस दररोज विनामास्क फिरणाऱ्या सरासरी तीनशे ते साडेतीनशे बेशिस्तांसह नियम मोडणारे दुकानदार व नियमांचे उल्लंघन करून वाहने रस्त्यांवर घेऊन फिरणाऱ्यांकडून दररोज अडीच ते तीन लाखांचा दंड वसूल करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी व्हावा, रूग्णांचा मृत्यू होणार नाही, यादृष्टीने महापालिका प्रशासन पूर्णपणे खबरदारी घेत आहे. तरीही बेशिस्तांमुळे कोरोनाचा प्रसार म्हणावा तितका कमी झालेला नाही. त्यामुळे कडक संचारबंदी 15 मेपर्यंत वाढविण्यात आली. त्यामध्ये शहरातील मेडिकल, हॉस्पिटल वगळता अन्य दुकाने दर शनिवारी, रविवारी बंद ठेवली जाणार आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, असेही आयुक्‍तांनी आदेशातून स्पष्ट केले आहे.

चार तालुक्‍यात कडक निर्बंध लागू करा

जिल्ह्यातील करमाळा, पंढरपूर, माळशिरस आणि माढा या तालुक्‍यात अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या तालुक्‍यातील निर्बंध काटेकोर करावेत. गर्दी होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. कोरोनाच्या चाचण्या आणि संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले. त्यासंदर्भात नियोजन भवन येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

ठळक बाबी...

  • कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 15 मेपर्यंत कडक संचारबंदी

  • दर शनिवारी, रविवारी राहणार कडक संचारबंदी; वैद्यकीय सुविधांशिवाय काहीच सुरू राहणार नाही

  • घरोघरी दूधविक्री सकाळी नऊ वाजेपर्यंतच सुरू राहणार; महापालिका आयुक्‍तांनी काढले नवे आदेश

  • प्रत्येकी शनिवारी, रविवारी शहरातील बाजार, दुकाने बंदच राहणार

  • नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन; पोलिसांमार्फत राहणार बेशिस्तांवर वॉच