दुचाकीवरून मुलासोबत मुलगी पसार! महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीवरून मुलासोबत मुलगी पसार! महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार
दुचाकीवरून मुलासोबत मुलगी पसार! महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार

दुचाकीवरून मुलासोबत मुलगी पसार! महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार

सोलापूर : शहराजवळील बाळे परिसरातील 26 वर्षीय तरुणी शहरातील एका तरुणासोबत पळून गेली आहे. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मुलगी कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडली. दुचाकीवरून ते दोघे पसार झाल्याची फिर्याद (Crime) मुलीच्या कुटुंबीयांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरठ यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दोघांचा शोध सुरू आहे. मागील दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

विनापरवाना ड्रोन वापरण्यावर बंदी

शहर पोलिस आयुक्‍तालयाच्या परवानगीशिवाय ड्रोनद्वारे प्रक्षेपण करणे, ड्रोनचा वापर करण्यावर 30 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने ड्रोनद्वारे हल्ले होणार नाहीत, याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे यांनी नवे आदेश काढले आहेत. या आदेशाची प्रत सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी दर्शनीय भागात लावावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा: अखेर 'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्याचे आदेश! नगरविकास विभागाची मंजुरी

लग्नाच्या आमिषाने रिक्षाचालकाचा महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी शहरातील रिक्षा चालकावर विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सुनील राठोड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित महिला पतीजवळ राहात नसून ती आईसोबत एकटीच राहात होती. राठोड याने तिच्याशी जवळीक साधली आणि रिक्षा घेण्यासाठी तिच्याकडून 28 हजार रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्याने बचत गटाचे हप्ते भरतो, असे सांगितले. मात्र, लॉकडाउनच्या काळात रिक्षा वाहतूक बंद असल्याने हप्ते भरले नाहीत. त्यामुळे पीडित महिलेने हप्ते भरण्यास त्याच्याकडे तगादा लावला होता. मात्र, तो हप्ता भरण्यास टाळाटाळ करू लागला. एके दिवशी राठोड पीडित महिलेच्या घरी आला आणि मी तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने वारंवार अत्याचार केला आणि महिला गर्भवती झाली. परंतु, त्याने गोड बोलून गर्भपात केला. काही दिवस चांगले राहिल्यानंतर त्याने महिलेला मारहाण केली. त्यानंतर 18 ऑक्‍टोबर रोजी पुन्हा त्या महिलेवर त्याने अत्याचार केला. दरम्यान, ऑक्‍टोबर महिन्यात तो सोलापूरहून मुंबईला निघून गेला. महिलेने सुनीलचा नाद सोडावा म्हणून त्याची आई, वहिनी व भाऊ यांनी महिलेला मारहाण करून दमदाटी केली. त्यानंतर पीडित महिलेने थेट पोलिस ठाणे गाठले.

हेही वाचा: त्रिपुरातील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर पोलिस अ‍ॅलर्ट!

फ्रूट बिअरचालकांकडून तरुणाला मारहाण

भवानी पेठ, घोंगडे वस्ती परिसरातील सुनील हणमंतू नाटीकर यांना व त्यांच्या भावाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सैदप्पा शिंदे, चेतन शिंदे, प्रशांत शिंदे, नितीन होटकर व सोनू होटकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फ्रूट बिअरच्या ग्राहकांच्या दुचाकी आमच्या घरासमोर लावू नका, आमची गाडी त्या ठिकाणी लावायची आहे, असे म्हटल्याने सैदप्पा याने फिर्यादी सुनील नाटीकर यांच्या भावाला शिवीगाळ केली. भांडण सोडवायला आलेल्या आई व वहिनीलाही त्याने लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तर उर्वरित चौघांनीही लाकडी दांडक्‍याने, हाताने मारहाण केली. तुला आता खल्लास करतो, अशी धमकीही त्यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत.

loading image
go to top