esakal | सोलापूरला लागतोय दररोज 41 मे.टन ऑक्‍सिजन! 11328 रुग्ण; आरोग्य सुविधा व्हेंटिलेटरवर

बोलून बातमी शोधा

ventilater
सोलापूरला लागतोय दररोज 41 मे.टन ऑक्‍सिजन! 11328 रुग्ण; आरोग्य सुविधा व्हेंटिलेटरवर
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मध्यम, तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनची व "रेमडेसिव्हीर'ची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र, जिल्ह्यात सध्या मागणीच्या प्रमाणात पाच मेट्रिक टन ऑक्‍सिजन तर दीड हजार रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन्स कमी मिळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठा प्रश्‍न उभा आहे. दिवसेंदिवस आरोग्य सुविधांअभावी ही यंत्रणाच व्हेंटिलेटरवर जाऊ लागली आहे.

शहरातील जवळपास 50 तर ग्रामीण भागातील 70 हून अधिक खासगी व सरकारी रुग्णालयांमधून कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. त्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील 28 रुग्णालयांचाही समावेश आहे. शहर-जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 80 हजारांवर गेली आहे तर मृत्यूची संख्या अडीच हजारांच्या उंबरठ्यावर आहे. अशी परिस्थिती असतानाही आत्तापर्यंत केवळ चार हजार रुग्णांनाच या योजनेच्या निकषांनुसार लाभ मिळाला आहे. शासकीय रुग्णालयांची कमतरता असल्याने रुग्णांना लाखो रुपयांचा खर्च करून खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत असल्याचेही चित्र सध्या दिसत आहे.

सध्या सोलापूर शहर असो वा ग्रामीण भागातील बऱ्याच कुटुंबातील एकाहून अधिक सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. काहीजण कोव्हिड केअर सेंटरमध्ये आहेत, तर काही सदस्य रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. अनेकांना बेड मिळत नसल्याचा अनुभव येऊ लागला आहे. तर काहींनी कोव्हिड केअर सेंटरमध्ये पुरेशा सुविधा नसल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना लक्षणे असल्यास तत्काळ कोरोना टेस्ट करून उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे.

रुग्णालयांची हतबलता

काही खासगी हॉस्पिटल्सने त्यांच्या दवाखान्याबाहेर असे बोर्ड लावलेले आहेत की, आम्ही तुमची सेवा करण्यास तयार आहोत, परंतु आमच्याकडे ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाहीत. हॉस्पिटल्सकडून अशी दिलगिरी व्यक्त होत असल्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीला काही लक्षणे असल्यास त्याची कोरोना टेस्ट करण्यापूर्वीच काहीजण खासगी, सरकारी रुग्णालयांमध्ये बेड बुकिंग करून ठेवत असल्याचीही चर्चा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व शहरातील महापालिकेचे बॉईज व वाडिया हॉस्पिटलमधील सर्व बेड सध्या फुल्ल आहेत. तर दुसरीकडे कोव्हिड केअर सेंटरमध्येही सध्या जागांच्या उपलब्धतेबाबत साशंकता आहे. आगामी काळात प्रत्येक प्रभागामध्ये कोव्हिड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी नगरसेवकांनी आता लावून धरली आहे. तर काहींनी मुंबईच्या धर्तीवर सोलापूर शहरात महापालिकेच्या जागेवर जम्बो हॉस्पिटल उभारावे, अशी मागणी केली आहे. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत सध्या पैसा नसल्याने त्यावर अजूनही प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.

भागवाभागवी केली जात आहे

जिल्ह्यासाठी सध्या 41 मेट्रिक टन ऑक्‍सिजनची गरज आहे. तर 1900 रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनची मागणी असून सध्या दररोज जवळपास 400 इंजेक्‍शन्स मिळत आहेत. ज्या रुग्णालयात ऑक्‍सिजन शिल्लक आहे त्या ठिकाणाहून गरज असलेल्या रुग्णालयांना ऑक्‍सिजन पुरवला जात आहे.

- भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी

गरजेच्या ठिकाणीच कोव्हिड केअर सेंटर

ग्रामीण भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत असलेल्या ज्या गावांमध्ये 25 पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत, अशा ठिकाणी स्वतंत्रपणे कोव्हिड केअर सेंटर उभारण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे. मनुष्यबळाची उपलब्धता पाहून त्यासंदर्भात काही दिवसांत ठोस निर्णय घेतला जाईल.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सोलापूर जिल्ह्याची स्थिती

  • कोरोनावर उपचार करणारी रुग्णालये : अंदाजित 120

  • एकूण ऍक्‍टिव्ह रुग्ण : 10,840

  • ऑक्‍सिजनची दररोज मागणी : 41 मेट्रिक टन

  • दररोज मिळणारा अक्‍सिजन : 36 मेट्रिक टन

  • "रेमडेसिव्हीर'ची दैनंदिन गरज : 1900

  • दररोज मिळणारे रेमडेसिव्हीर : 400

ऑक्‍सिजन वाहतुकीसाठी रिक्षांची मदत

सोलापूर जिल्ह्यासाठी चाकण एमआयडीसीतून दररोज 24 मेट्रिक टन तर हैदराबाद येथून 12 मेट्रिक टन ऑक्‍सिजन मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात अद्यापही ऑक्‍सिजन निर्मितीचा प्लांट तयार झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्याची मदार अन्य जिल्ह्यांवर अवलंबून आहे. तर बाहेरून टॅंकरद्वारे आलेला ऑक्‍सिजन सोलापूर जिल्ह्यातील चार प्लांटमधून सिलिंडरमध्ये भरून विविध रुग्णालयांना पुरविला जात आहे. त्यासाठी ज्या खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन शिल्लक आहे, तो ऑक्‍सिजन आणि खासगी रुग्णालयांना पुरवण्यासाठी रिक्षांची मदत घेतली जात आहे, असेही निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.