
सोलापूर : चार वर्षांपूर्वी टेंडर निघालेली 110 किलोमीटरची सोलापूर ते उजनी धरण ही समांतर जलवाहिनी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. चार वर्षांत केवळ 15-16 किलोमीटरपर्यंतच काम पूर्ण झाले असून सगळे काम संपायला तब्बल तीन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे नियमित पाणी पुरवठ्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आले नाही. त्याचे खापर आता महापौर श्रीकांचना यन्नम यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडले आहे.
महापालिकेची स्थापना झाल्यापासून दुसऱ्यांदा भाजपला एकहाती सत्ता मिळाली. पाच वर्षांत ना उत्पन्न वाढले ना, शहराचा विकास झाला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. सध्या महापालिकेची तिजोरी रिकामी असून बाहेरील देणे 100 कोटींपर्यंत आहे. दुसरीकडे हद्दवाढ भागातील सर्व नागरिकांना ना ड्रेनेज ना नियमित पाणी मिळाले. शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यांवरील खड्डेदेखील सत्ताधाऱ्यांना बुजविता आलेले नाहीत, असेही विरोधकांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकीवेळी विरोधक याच मुद्द्यावर प्रचार करतील, हे निश्चित आहे. मात्र, समांतर जलवाहिनी पूर्ण करून नागरिकांना नियमित पाणी देण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला, निविदा काढली, कामही सुरु झाले. परंतु, कोरोना आणि महाविकास आघाडीकडून निधी मिळाला नाही. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जागा मिळविली आणि भूसंपादनाचा प्रश्न मिटविला. त्यामुळे समांतर जलवाहिनीला आडकाठी आणली कुणी, याची वस्तुस्थिती आम्ही जनतेसमोर मांडू, असे सत्ताधारी भाजपने म्हटले आहे.
भाजपची सत्ता असताना राज्य सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. पण, राज्यातील सत्ता बदलल्यानंतर विकासकामांच्या निधीसाठी संघर्ष करावा लागला. समांतर जलवाहिनीसाठी वेळोवेळी निधीची मागणी करूनही महाविकास आघाडी सरकारकडून तो मिळाला नाही. त्यामुळेच समांतर जलवाहिनीचे काम रखडले.
- श्रीकांचना यन्नम, महापौर
निवडणुकीमुळे सरकारची निधी देण्याची तयारी
समांतर जलवाहिनीसाठी भूसंपादन करावे लागणार होते, त्यावेळी राज्य सरकारकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवून त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. पण, महाविकास आघाडी सरकारने पैसे देण्यास नकार दिला. आता महापालिका निवडणूक होणार असल्याने वाढीव निधी देण्याचे मान्य केले आहे, असा आरोपही महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केला. महाविकास आघाडी सरकारमुळेच समांतर जलवाहिनीसाठी विलंब लागला, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, सत्ताधारी भाजपचा उद्या (सोमवारी) पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होणार असून निवडणूक होईपर्यंत आयुक्त पी. शिवशंकर हे प्रशासक म्हणून कारभार सांभाळतील.
समांतर जलवाहिनीचा प्रवास...
- सुरवातीला 450 कोटींचे बजेट, आता 800 कोटी लागणार
- समांतर जलवाहिनीबद्दल 2017 मध्ये झाली होती चर्चा
- 2018 मध्ये जलवाहिनीच्या कामाची निघाली निविदा
- कंत्राटदार नियुक्त करून त्याला 2019 मध्ये दिली वर्क ऑर्डर
- 9 सप्टेंबर 2020 रोजी जलवाहिनीच्या कामाला सुरवात झाली
- मक्तेदार बदलून आता मार्च 2022 अखेर नव्याने निघणार नवीन टेंडर
- आतापर्यंत 16 किलोमीटरपर्यंत काम पूर्ण, उर्वरित कामासाठी लागणार 3 वर्षे
- पूर्वी महापालिकेला 50 कोटींचा हिस्सा द्यावा लागत होता, आता 100 कोटी द्यावे लागतील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.