
सोलापूर : रस्ते झाले मोठे पण झाडांविना पोरके
सांगोला - दळणवळण सुविधांसाठी नवे रस्ते निर्माण होणे महत्त्वाचे आहे. छोट्याचे मोठे रस्ते बनले, परंतु हे रस्ते निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांच्या जुन्या झाडांची तोड मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झाडांची कत्तल झाल्याने हेच महामार्ग सध्या झाडांविना पोरके झाले आहेत. रस्त्याजवळील सावलीच हरवल्याने प्रवाशांचेही ऐन उन्हाळ्यात हाल होत आहेत. अनेक भागातील रस्त्यांची व रस्त्यावरील एखाद्या ठिकाणाची तेथे असणाऱ्या झाडांच्या संख्येमुळे व सावलीमुळे एकप्रकारची वेगळी ओळख निर्माण झाली होती. लांबच्या प्रवासाला निघालेले प्रवासी किंवा कुटुंबीय रस्त्यावरील मोठ्या झाडाची दाट सावली पाहून विश्रांतीसाठी, जेवण करण्यासाठी एकत्रित बसत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी रस्त्यावरून पहावयास मिळत होते.
अनेक वर्षांचे असणारे मोठे वृक्ष या रस्त्याची एक वेगळी ओळख निर्माण करत होते. अनेक प्रवासी, वाहधारक अशा वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबत असत. तसेच लांब पल्ल्याच्या मालवाहू वाहनांमधील वाहनचालक अशा झाडांच्या सावलीत स्वयंपाकही बनवीत असत. परंतु सध्या सर्वत्र रस्त्यांचे आधुनिकीकरण आणि रुंदीकरण होऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये व विशेषत: पंढरपूर तीर्थक्षेत्राला जोडणारे सर्वच रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहेत. तर काहींची कामे सुरू आहेत. या रस्ते रुंदीकरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून आपली ओळख निर्माण करणाऱ्या जुन्या वृक्षांची मात्र कत्तल झाली आहे. सिमेंटची आधुनिक रस्ते निर्माण होऊ लागले, मात्र जुन्या रस्त्यांकडेला असणारे झाडे मात्र तोडली गेल्याने रस्ते पोरगी दिसू लागली आहेत. मोठी, जुनी झाडे तोडल्याने त्याठिकाणची ओळखही पुसून गेली आहे.
गावे ओळखू येईनात
रस्त्याकडेला असणाऱ्या खेडे गावाची ओळख रस्त्याजवळ असणारी गाववेस, झाडे किंवा घरबांधणीच्या प्रकारामुळे दिसून येत होती. परंतु मोठे महामार्ग बनल्याने ते बनविताना गावाबाहेरून किंवा गावाजवळ उड्डाणपूल केल्याने संबंधित गावे ओळखणे अवघड झाले आहे.
सावलीविना प्रवासी बेहाल
या अगोदर अनेक रस्त्यांजवळ मोठी झाडे असल्याने ऐन उन्हाळ्यात वाहनधारक अशा झाडांच्या सावलीचा आधार घेऊन रस्त्याकडेला थांबत होते. तसेच अनेक ठिकाणे ''एसटी''चा थांबा अशा मोठ्या वृक्षाच्या जवळच असायचा. त्यामुळे प्रवासी झाडाच्या सावलीखाली एसटीची वाट पाहत बसलेले असायचे. वाहनचालक प्रवासी विश्रांतीसाठी झाडांच्या सावलीत थांबत. परंतु महामार्ग रुंदीच्या नावाखाली वृक्षतोड झाल्याने अशा प्रवाशांचा, वाहनधारकांचा सावलीचा आधारच तुटून गेला आहे.
वृक्ष लागवडीची नोंद नाही
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडचणी होणाऱ्या झाडांची तोडण्यासाठी संबंधित तालुक्याच्या वन विभागाकडे रीतसरपणे परवानगी घेतली गेली. परंतु ज्या वनविभागाने वृक्षतोडीसाठी परवानगी दिले त्यांच्याकडे किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांकडे अनेक रस्त्यांच्या नवीन वृक्ष लागवडीची नोंदीच नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. वृक्षतोडीनंतर त्यापेक्षा जास्त पटीने संबंधित रस्त्याकडेला वृक्षलागवड करणे गरजेचे असताना अनेक रस्त्याकडेला नवीन वृक्षलागवडीचा संबंधित ठेकेदाराचा, विभागाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. रस्ते तयार करण्याबरोबरच नवीन वृक्ष लागवडीसाठी संबंधित ठेकेदारांना त्यासाठी पैसे मोजले जातात ते कशासाठी असा प्रश्न जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.
Web Title: The Roads Became Big But Orphans Without Trees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..