esakal | शाळेत जाताना सावधान! 'अशी' राहील पालक व शिक्षकांची जबाबदारी | Educational
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेत जाताना सावधान! 'अशी' राहील पालक व शिक्षकांची जबाबदारी

विद्यार्थ्यांना शाळेत पाठविताना पालकांनी तर शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळेत जाताना सावधान! 'अशी' राहील पालक व शिक्षकांची जबाबदारी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ग्रामीण भागासह शहरातील शाळांची (School) घंटा सोमवारी (4 ऑक्‍टोबर) वाजणार आहे. दीड वर्षानंतर शाळेचा आवार पुन्हा गजबजणार आहे. मात्र, कोरोना (Covid-19) काळात मोबाईलवर ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेतलेले आणि शिक्षणापासून दूर गेलेले विद्यार्थी शाळेत येणार आहेत. त्यामुळे त्यांची मानसिकता ओळखून त्यांना शिक्षणाचे धडे देण्याची गरज आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता असल्याने नियमांचेही काटेकोर पालन होणे गरजेचे आहे.

शहरातील आठवी ते बारावीपर्यंत तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आता ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. कोरोनाच्या दोन्ही लाटेपासून सुरक्षित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वात पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविताना पालकांनी तर शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

दुसरीकडे शाळेत स्थापन होणाऱ्या "हेल्थ क्‍लिनिक'साठी विविध वस्तू लागणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे तापमान मोजणारे यंत्र, सॅनिटायझर, हात स्वच्छ धुण्यासाठी साबण अशा वस्तूंचा समावेश आहे. त्यासाठी लागणारा खर्च शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. तरीही, निधी कमी पडत असल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही सीईओ स्वामी यांनी दिली आहे.

हेही वाचा: विसर पडलेल्या शाळा सोमवारपासून सुरू होतील, पण...

पहिली ते चौथीचे वर्ग पुढच्या टप्प्यात

मार्च 2020 मध्ये कोरोनाचे आगमन महाराष्ट्रात झाल्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. पुढे पहिली लाट ओसरल्यानंतर पाचवीपासूनचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने काही दिवसांसाठी सुरू झाले. मात्र, पुन्हा ते बंद करावे लागले. आता पाचवीपासून पुढील वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र, पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत सर्वांनीच सावध भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता पाहून त्यासंबंधीचा निर्णय पुढील टप्प्यात घेतला जाणार आहे.

मुलांबाबत पालकांची जबाबदारी

 • मुलांच्या मनातील भीती दूर करून त्यांना शाळेत जाण्यास प्रवृत्त करावे

 • शाळेतून घरी आल्यानंतर कपडे स्वच्छ करून त्यांना स्नान करण्यास सांगावे

 • शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी शिक्षकांशी समन्वय साधावा

 • मुलांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक विकासाला द्यावे प्राधान्य

 • भीती दूर करण्यासाठी वेळोवेळी मुलांशी सकारात्मक संवाद ठेवावा

 • मुलांसोबत सॅनिटायझर, पाण्याची बाटली, तोंडाला मास्क, अशी तयारी करून पाठवावे

शिक्षकांची प्रमुख जबाबदारी

 • पालकांनी मुले शाळेत पाठवावीत म्हणून त्यांना प्रवृत्त करणे

 • पहिले दोन आठवडे थेट अभ्यासक्रमावर भर न देता मानसिकतेचा विचार करून विशेष उपक्रम घ्यावेत

 • मुलांच्या पूर्वज्ञानाचा आढावा घेऊन त्यांना स्तरनिहाय शिक्षणाचे धडे द्यावेत

 • पालकांच्या मनातील कोरोनाबद्दलची भीती दूर करून त्यांचे उद्‌बोधन करावे

 • मुलाच्या स्तराबद्दल पालकांना कल्पना देऊन दोघांच्या समन्वयातून त्याची प्रगती साधावी

 • गर्दी होणार नाही, विद्यार्थ्यांनी हात स्वच्छ धुवावेत, मास्क घालावा याबद्दल त्यांना मार्गदर्शन करावे

हेही वाचा: Solapur : कोरोना काळातही 'ही' शाळा 70 दिवसांपासून आहे अखंड सुरू!

सोमवारपासून शाळा सुरू होत असल्याचा पालक व विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला आहे. परंतु, कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे शाळेच्या प्रवेशद्वारावरच त्यांना सॅनिटायझर द्यावे. सर्वसामान्य मुलांकडे मास्क नसेल तर त्यांना मास्कही मिळावा.

- मीनाक्षी कारंडे, पालक

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपक्रमातून शिक्षणापासून वंचित राहिलेली मुले प्रवाहात आली. आता शाळा सुरू झाल्यानंतर अध्यापनाबरोबरच त्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाईल.

- आशा गुमटे, शिक्षिका

शाळा व विद्यार्थ्यांची संख्या

 • पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा : 2,098

 • सुरु होणाऱ्या शाळा : 1,980

 • एकूण विद्यार्थी : 2.51 लाख

 • शहरातील शाळा : 157

 • अंदाजित विद्यार्थी संख्या : 49,000

loading image
go to top