ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचे वाजले बारा ! ऑनलाइन-ऑफलाइनचा घोळ, विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर

Online Education
Online Education

चिखलठाण (सोलापूर) : कोरोना कळात ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणाच्या नादात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे बारा वाजले आहेत. मागील एक वर्षापासून अनेक मुलांनी हातात वही, पुस्तक, पेन्सिलच न धरल्याने आजच्या स्पर्धेच्या युगात अशा विद्यार्थ्यांचे भवितव्य काय राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या मार्चपासून शाळा बंद आहेत. याचा सर्वांत मोठा फटका ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर पालकांच्या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना बसला आहे. गेल्या एक वर्षापासून या बहुतांश विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक, वही, पेन्सिल, पेन काहीच नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्‍यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. 

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाचे प्रयोग केले गेले. ग्रामीण भागातून याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सुरवातीला याची मोठी चर्चा झाली. शिकण्यासाठी या पर्यायाची मदत होत असल्याचे सर्वच मान्य करतील; परंतु प्रत्यक्ष शिकवण्याला हा पर्याय ठरू शकलेला नाही. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल उपलब्ध नाहीत. शिक्षणाबाबतीत सजग असणाऱ्या शहरी पालकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणाच्या जोडीला आपल्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचा अभ्यास करून घेतला. मात्र ग्रामीण भागातील अल्पशिक्षित, अशिक्षित पालकांच्या मुलांची गेल्या वर्षापासून पुस्तक, वही, पेन्सिल याची ओळखच मोडली आहे. कोरोनाच्या संकटानंतर नियमितपणे शाळा सुरू झाल्यास हे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत फारच मागे पडणार असल्याने त्यांचे भविष्य अंध:कारमय झाले आहे. 

कोरोनामुळे शाळेतील शिक्षण बंद पडले. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. परंतु ऑनलाइनला मर्यादा असल्याने तो समर्थ पर्याय ठरू शकला नाही. तरीही विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून दूर जाऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सध्या ऑनलाइन स्वाध्याय उपक्रम सुरू असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- विवेक पाथ्रुडकर, 
प्राथमिक शिक्षक, चिखलठाण 

इयत्ता चौथीच्या आतील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण फारसे समजत नाही. पालकांनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या मुलांचा अभ्यास करून घेणे ही या काळात पालकांची मोठी जबाबदारी बनली आहे. जे पालक अशिक्षित आहेत किंवा आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. 
- राजेंद्र साबळे, 
पालक, शेटफळ, ता. करमाळा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com