औरंगजेबाला आले होते येथे कायमचे अपंगत्व ! आध्यात्मिक, ऐतिहासिक, निसर्गसौंदर्याने नटलेली पर्यटन पंढरी माणदेशी सांगोला

Sangola
Sangola

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील खवासपूर-माण परिसरात औरंगजेबाचा गुडघा निसटून कायमचे अपंगत्व आले होते. येथील श्रीधर स्वामींचे प्रसिद्ध नाझरे गाव, वाढेगाव येथे तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील निसर्गरम्य परिसर, महाराष्ट्रातील पहिली ग्रामीण सांगोला नगरपालिका, माडगूळकरांच्या साहित्यातून अजरामर झालेल्या माण नदी परिसरातील वृक्षसंपदेचे जतन व संवर्धन झाले तर या परिसरात पर्यटनाला निश्‍चितच चालना मिळू शकेल. 

माण प्रदेशाचे महत्त्व 
1534 ते 1710 या प्रदीर्घ कालखंडात माणदेशचा प्रदेश सतत संघर्षाचा राहिला होता. सुमारे 165 किलोमीटर लांबीच्या माण नदी खोऱ्यात सांगोला तालुक्‍यातील माण खोऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निजामशहा, आदिलशहा, मोगल आणि मराठ्यांच्या सरहद्दीवरील सीमारेषेचा माणदेश प्रदेश अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार आहे. हा प्रदेश कधी निजामशहाकडे, तर कधी आदिलशहाकडे, तर कधी मोगल, मराठ्यांकडे होता. सतत बदलत्या राजवटीमुळे हा प्रदेश राजकीयदृष्ट्या कायमच अस्थिर होता. 1683 च्या आदिलशहा व मोगलात झालेल्या तहात त्या वेळी आदिलशहाने हा प्रदेश आग्रहाने मागितला असता बादशहाने तो दिला नाही. यावरून त्या काळात माण प्रदेशाला राजकीयदृष्ट्या किती महत्त्व होते हे लक्षात येते. येथून जवळच बहादूर गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. 

माण नदीचा पराक्रम, औरंगजेबाचा मोडला पाय 
मराठ्यांचे राज्य नामशेष करण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत आला होता. परंतु मराठ्यांच्या गनिमी हल्ल्याने तो हैराण झाला होता. प्रचंड फौज आणि युद्धसामग्री असूनही मराठ्यांना नामोहरम करता येत नसल्याने औरंगजेब बादशहा स्वतःच मोहिमेवर आला होता. सातारा - परळीचे किल्ले परिसराचा प्रदेश जिंकून घेत पुढे निघाला. सह्याद्रीत पावसाचा जोर वाढल्याने तो परत पूर्वेकडे माण देशात उतरला. सातारा भूषणगड येथे मुक्काम करून 14 सप्टेंबर 1700 रोजी तो सांगोला तालुक्‍यातील माण नदीच्या काठाच्या खवासपूर येथे येऊन थांबला. खवासपूर परिसरात छावणी टाकून फौज विश्रांती घेत होती. परंतु, 1 ऑक्‍टोबर 1700 रोजी बादशहाची फौज झोपेत असताना मध्यरात्री अचानक नदीच्या वरच्या भागात पडलेल्या मुसळधार पावसाने नदीला प्रचंड पूर आला. पाणी पात्राच्या बाहेर छावणीत घुसले. बेसावध असलेल्या फौजेची नैसर्गिक संकटामुळे एकच धावपळ उडाली. अनेकजण या महापुरात वाहून गेले. छावणीच्या सैरभैरमुळे औरंगजेबही बाहेर पडत असताना पडल्याने त्याचा गुडघा निखळला व त्याला कायमचे अपंगत्व आले. 

महाराष्ट्रातील पहिली ग्रामीण नगरपालिका 
1818 ला पेशवाई नष्ट झाल्याने ब्रिटिश राजवटीचा प्रारंभ झाला. पेशव्यांच्या ताब्यातील सर्व प्रदेश ब्रिटिशांकडे आला. सांगोला परगणाही ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली आला. सांगोल्याच्या किल्ल्याचे महत्त्व संपले व इंग्रजांचे राज्य सुरू झाले. सातारा कलेक्‍टरच्या अधिपत्याखाली पंढरपूरचे मामलेदार सांगोल्याचा कारभार पाहत. 1850 साली संपूर्ण हिंदुस्थानसाठी स्थानिक स्वराज्य संस्था विषयक कायदा पास झाला. सांगोला नगरपालिका 10 जानेवारी 1855 ला स्थापन झाली. या कायद्यानुसार मुंबई इलाख्यात पहिली ग्रामीण नगरपालिका सांगोला येथे स्थापन केली. 1903 साली पंढरपूर व सांगोला सोलापूर जिल्ह्यात आले व नंतर सांगोला तालुका निर्माण झाला. 

श्रीधर स्वामींचे नाझरे 
सांगोला तालुक्‍यातील माण नदीच्या काठावर असणारे नाझरे या गावात संतकवी श्रीधर स्वामी तथा ब्रह्मानंद नाझरेकर महाराज होऊन गेले. त्यांचा जन्म 1658 च्या आसपासचा होता. सतराव्या शतकातील एक प्रसिद्ध आख्यान कवी म्हणून ते सर्वत्र परिचित होते. संतकवी श्रीधर स्वामी हे मराठी काव्याच्या सुवर्णकाळातील एक अग्रणी कवी होते. सातारा येथील छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात त्यांचा मोठा सन्मान करून त्यांना एक गाव इनाम दिले होते. श्रीधर स्वामी यांची सर्वात मोठी व महत्त्वपूर्ण ग्रंथ निर्मिती म्हणजे शिवलीलामृत. आजही नाझरे येथे त्यांच्या नावाने एक मोठा मठ आहे. श्रीधर स्वामींचे नाझरे म्हणूनच या गावाची ओळख सर्वदूर आहे. माण नदीच्या उत्तरेकडे दत्ताचे मोठे मंदिर आहे. या ठिकाणी स्वामी महाराज यांची संजीवन समाधी आहे. अतिशय भक्तिभावाने अनेक भक्त या मंदिरास भेट देतात. श्रीधर स्वामींच्या नाझरे या माण काठावरील गावास भौतिक सुविधा चांगल्या केल्यास येथेही पर्यटनाला नामी संधी आहे. 

त्रिवेणी संगम, वाढेगाव 
माण, कोरडा, अफ्रुका या तीन नद्यांचा वाढेगाव येथे संगम आहे. याच नद्यांच्या त्रिवेणी संगमावर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. उत्तरवाहिनी तीन नद्यांचा संगम असल्याने या स्थानाला श्रीक्षेत्र काशीचे प्रतिरूप समजले जाते. या ठिकाणी अनेक साधू, संत, महंत येऊन ध्यानधारणा करत होते, असे सांगितले जात होते. या त्रिवेणी संगमावर असलेले प्राचीन महादेवाचे मंदिर, त्या परिसरात असलेले वेगवेगळे वृक्ष, संगमावर येणारे विविध पक्षी यामुळे येथे पर्यटनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील त्रिवेणी संगमाचा अजून विकास झाला तर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढू शकेल. 

माण प्रदेश पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. माण नदी परिसरातीलही स्वच्छता मोहीम राबवली जात असून यासाठी नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. 
- वैजिनाथ घोंगडे, 
प्रमुख, माणगंगा भ्रमणसेवा संस्था 

सांगोला हे ऐतिहासिक शहर असून शहरातील सांगोला किल्ला, अंबिका देवी मंदिर व माण प्रदेशानजीक असलेल्या ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. 
- चेतनसिंह केदार-सावंत, 
तालुकाध्यक्ष, भाजप, सांगोला 

सांगोला शहराचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी राजकीयदृष्ट्या लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी निधीची उभारणी केली पाहिजे. ऐतिहासिक वारसा जतन करून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे. 
- आनंदा माने, 
गटनेते, सांगोला नगरपरिषद 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com