esakal | जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाख अन्‌ केंद्रे फक्‍त 126 ! मागणीच्या प्रमाणात मिळेनात लस

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाखांवर असतानाही जिल्ह्यात अवघे 126 लसीकरण केंद्रेच सुरू झाली आहेत. तरीही या केंद्रांना पुरेशा प्रमाणात मागणी करूनही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाख अन्‌ केंद्रे फक्‍त 126 ! मागणीच्या प्रमाणात मिळेनात लस

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाखांवर असतानाही जिल्ह्यात अवघे 126 लसीकरण केंद्रेच सुरू झाली आहेत. तरीही या केंद्रांना पुरेशा प्रमाणात मागणी करूनही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. शहरात 27 तर जिल्ह्यात 99 ठिकाणी लसीकरण सुरू असून त्यासाठी साडेसहा लाख डोस द्यावेत, अशी मागणी नोंदविण्यात आली; जेणेकरून केंद्रे वाढवून लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्याचे नियोजन झाले. मात्र, आठवड्यातून एकदा 20 ते 30 हजार डोस मिळत असल्याने काही लसीकरण केंद्रे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 

कोरोनाला आवर घालण्यासाठी नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. दुसरीकडे मात्र, लसीचा तुटवडा भासू लागला असून जिल्ह्यातील लसीचा स्टॉक संपत आल्यानंतर बुधवारी (ता. 7) शहर- जिल्ह्यासाठी 19 हजार 500 डोस मिळाले आहेत. त्यामुळे तूर्तास लसीकरणाची चिंता दूर झाली आहे. कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचण्यास सुरवात झाल्यापासून सोलापूरसाठी दोन लाख सात हजार 30 डोस मिळाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह को-मॉर्बिड रुग्ण आणि 45 वर्षांवरील सर्वांनाच लस टोचली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत लसीचा पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमध्ये फरक होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात कोव्हॅक्‍सिन आणि कोविशिल्ड असे स्वतंत्र केंद्रे उभारली जाणार आहेत. नागरिकांनी लसीकरणासाठी येताना मास्क घालून यावा, लक्षणे असलेल्यांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 

दरम्यान, लसीकरणासाठी गर्दी वाढत असल्याने सोलापूर जिल्ह्यासाठी साडेसहा लाख डोस द्यावेत, अशी मागणी नोंदविण्यात आली. एक लाख डोस मिळाल्यानंतर सर्वच लसीकरण केंद्रांवर पूर्णवेळ लसीकरण मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. परंतु, अजूनही तेवढे डोस मिळाले नसल्याने उपलब्ध लसीचा साठा जपून वापरला जात असल्याची माहिती लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली. 

कोविशिल्डलाच नागरिकांची सर्वाधिक पसंती 
आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख 70 हजार जणांनी लस टोचून घेतली आहे. त्यात 60 वर्षांवरील 69 हजार 114 जणांचा समावेश असून 34 हजार 863 हेल्थ वर्कर्स तर 27 हजार 607 फ्रंटलाइनवरील वर्कर्सचा समोवश आहे. दुसरीकडे 33 हजार 393 को-मॉर्बिड रुग्णांनी लस टोचून घेतली आहे. सुमारे 31 हजार जणांनी कोरोनाचा दुसरा डोस टोचून घेतला आहे. त्यामध्ये कोविशिल्ड व कोव्हॅक्‍सिन या दोन्हींपैकी कोविशिल्डलाच सर्वाधिक मागणी होत असल्याची स्थिती आहे. मात्र, मागणीप्रमाणे लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्रे वाढविता येत नसल्याची जिल्हाभर स्थिती पाहायला मिळत आहे. 

आजची लसीची स्थिती... 

  • जिल्ह्यासाठी आले लसीचे 19 हजार 500 डोस 
  • शहरासाठी दिले आठ हजार डोस तर ग्रामीणसाठी 11 हजार 500 डोसचा पुरवठा 
  • आतापर्यंत जिल्ह्याला मिळाले दोन लाख 26 हजार 530 डोस 
  • सर्वोपचार रुग्णालयासाठी बुधवारी आले कोव्हॅक्‍सिनचे 320 डोस 
  • साडेसहा लाख डोसची मागणी; जिल्ह्यातील 126 केंद्रांवर लसीकरण 
  • शहरात 27 तर ग्रामीण भागात लसीकरणाची 99 केंद्रे 

नियमित लस मिळतच नाही 
कोरोनावरील प्रतिबंधित लस घेण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून लसीचा मुबलक साठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी आम्ही नोंदविली आहे. मात्र, नियमित पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याने लस घेण्यासाठी आलेले नागरिक परत घरी जात आहेत. अनेकजण नाराज होऊन जात असल्याचा फटका आम्हाला सोसावा लागत असल्याचे मोणार्क हॉस्पिटलचे डॉ. अरुण मनगोळी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल