उजनीच्या बॅकवॉटरवरील विद्युत पंपावर चोरांची नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electric pump

उजनीच्या बॅकवॉटरवरील विद्युत पंपावर चोरांची नजर

कळस - उजनी धरणाच्या बॅक वॉटरची पाणी पातळी कमालीची घटली असल्याने शेतकऱ्यांना पिके जगवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या चोरीचे प्रकार घडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रात्रीच्या वेळेस विजेच्या भारनियमनाचा फायदा घेत चोरट्यांनी पळसदेव (ता.इंदापूर) येथील बॅकवाॅटरलगतचे चार विद्युत पंप खोलून त्यातील काॅपर चोरून नेले आहे. यामुळे शेतकऱ्यांची परवड झाली आहे. पोलिसांनी पंप चोरट्यांवर वचक बसविण्याची गरज असल्याचे शेतकरी बोलून दाखवित आहेत.

सध्या उजनी धरणाची पाणी पातळी मृत साठ्यात आहे. यामुळे बॅकवाॅटरचे पाणी विद्युत पंपापासून लांब गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून पिकांना पाणी देण्यासाठी धडपड सुरू आहे. विज असेल त्या वेळात पंप सुरू केले जात आहेत. ठरावीक ठिकाणी सामूहिकपणे शेतकऱ्यांनी चारी खोदून पाणी पंपापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या कष्टावर चोरट्यांकडून पाणी फिरवले जात आहे. संधी साधून चोरटे विद्युत पंप खोलून त्यातील काॅपर लंपास करत आहेत.

बॅकवाॅटरवरून पाणी नेलेले शेतकरी नवनाथ बोराटे म्हणाले, चोरट्यांनी रात्रीच्या भारनियमनाचा फायदा घेत माझ्यासह साहेबराव चोपडे, संपत मारकड, अनिल मारकड अशा चौघांचे 15 अश्वशक्तीचे विद्युत पंप खोलून काॅपर चोरून नेले आहे. एका पंपाला नवीन काॅपर बसविण्यासाठी 12 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. शेतकर्यांसाठी हा खर्च म्हणजे दुष्काळात तेरावा महिना या उक्तीप्रमाणे झाला आहे. पोलिसांनी अशा चोरांच्या वेळीच मुसक्या आवळण्याची गरज आहे.

Web Title: Thieves Keep An Eye On Electric Pump At Ujani Backwater

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top