वकील तेराशे अन्‌ बसायला अवघे ४४ चेंबर! ३३ वर्षांपासून वाढीव चेंबरची प्रतीक्षाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mantralay
वकील तेराशे अन्‌ बसायला अवघे ४४ चेंबर! ३३ वर्षांपासून वाढीव चेंबरची प्रतीक्षाच

वकील तेराशे अन्‌ बसायला अवघे ४४ चेंबर! ३३ वर्षांपासून वाढीव चेंबरची प्रतीक्षाच

सोलापूर : जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलांची संख्या जवळपास एक हजार ३३३ आहे. त्यातील साडेसहाशे वकील पक्षकारांच्या न्यायालयीन कामकाजासाठी नियमित न्यायालयात येतात. परंतु, त्यांना त्या ठिकाणी बसायला जागादेखील नाही, अशी स्थिती आहे. न्यायालयात साडेतेराशे वकिलांपैकी केवळ ४४ वकिलांनाच चेंबर मिळाले आहेत. मागील ३३ वर्षांत न्यायालयातील वकिलांचे चेंबर वाढलेले नाहीत, हे विशेष.

घरातील किरकोळ वादापासून खून, अत्याचारापर्यंतचे खटले न्यायालयात चालविले जातात. गावातील प्रतिष्ठित मंडळींनी सांगूनही किंवा आपापसांत वाद मिटवूनही त्यांच्यातील संघर्ष कायम राहतो. त्यावेळी न्यायासाठी लोक न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात. न्यायालयातील वकील त्या पक्षकारांना न्याय देण्यासाठी लढा देतो. काहीवेळा कमी मनुष्यबळामुळे निकालासाठी विलंबदेखील लागतो. अशावेळी संबंधित पक्षकाराच्या वकिलांना बसण्यासाठी न्यायालयात हक्काची जागा (चेंबर) हवी असते. अनेकदा त्याअनुषंगाने नवोदित व जुन्या प्रतिष्ठित वकिलांनी तशी मागणीदेखील केली; पण ठोस निर्णय होऊ शकला नाही, असे जाणकार सांगतात. विधी विकास पॅनेलच्या माध्यमातून सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष झालेले ॲड. नीलेश ठोकडे यांच्याकडून वकिलांना आपले प्रश्न सुटतील, अशी आशा होती. परंतु, त्यांनी काहीच काम केले नाही, असा आरोप निवडणुकीतील त्यांचे विरोधक ॲड. सुरेश गायकवाड यांनी केला. तरीदेखील आम्ही वकिलांसाठी खूप काही कामे केली असून, त्याची यादीच आपल्याकडे असल्याचे ॲड. ठोकडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. आता बार असोसिएशनच्या पुढील निवडणुकीची तयारी सुरू झाली असून सभासद वकिलांकडून वर्गणी संकलित केली जात आहे. जिल्हा न्यायालयाकडून शासनाला प्रस्ताव पाठविल्यानंतर विधी व न्याय विभागाने वकिलांच्या प्रश्नांवर तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्वांचीच आहे.

 • जिल्हा न्यायालयातील वकील अन्‌ चेंबरची स्थिती
  एकूण वकील
  १३,३३३
  कोर्टात नियमित येणारे अंदाजित वकील
  ६७८
  चेंबरसाठी वकिलांचे अर्ज
  १६६
  सध्याचे कोर्टातील चेंबर
  ४४

महिला वकिलांसाठी अपुरी व्यवस्था
जिल्हा न्यायालयाच्या आवारात वकिलांसाठी हक्काचे कार्यालय (चेंबर) असावे म्हणून १९८९ रोजी ४४ चेंबर बांधण्यात आले. त्यानंतर अनेकदा चेंबर वाढविण्याची मागणी झाली, पण त्यासंदर्भात शासन स्तरावरून निर्णय झाला नाही. न्यायालयातील महिला वकिलांची संख्या अंदाजित अडीचशेपर्यंत आहे. त्यांच्यासाठी देखील पुरेशा प्रमाणात बैठक व्यवस्था नाही. सभागृहाची क्षमता १५० ते २०० आणि वकिलांची संख्या तेराशेहून अधिक, अशी अवस्था आहे, अशी माहिती बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार ॲड. सुरेश गायकवाड यांनी दिली.

Web Title: Thirteen Hundred Lawyers And Only 44 Chambers To Sit 33 Years Of Waiting For Increased

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..