
जिल्ह्यातील तीन आमदारांना मिळणार मंत्रिपदे! ‘या’ आमदारांची नावे चर्चेत
सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील विजयकुमार देशमुख यांना कॅबिनेट तर राम सातपुते किंवा सचिन कल्याणशेट्टी या युवा चेहऱ्यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. तानाजी सावंत, रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय शिंदे, राजेंद्र राऊत यांचीही नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे काय डोंगार, काय झाडी, काय हाटेल म्हणत देशभर प्रकाशझोतात आलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटलांनाही एकनाथ शिंदेंच्या कोट्यातून राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: ‘ईडी’चा डाव यशस्वी! बंडखोरांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस ‘पुन्हा’ येणार?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने एकत्रित निवडणूक लढविली. पण, ऐनवेळी मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला आणि सर्वाधिक आमदार विजयी होऊनही भाजपला विरोधात बसावे लागले. सुरवातीला राष्ट्रवादीचा गट फोडण्यात फडणवीस यशस्वी झाले. पण, त्यांचा तो डाव फारकाळ यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतरही त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कोंडी झालेल्या शिवसेनेतील आमदार, मंत्र्यांवर जास्त फोकस केला. त्यांचा हा डाव सध्यातरी यशस्वी झाला. थेट पक्षप्रमुखांनाच आव्हान देत ५५ पैकी ३९ आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे पक्षप्रमुखांना अर्ध्यातूनच पायउतार व्हावे लागले. त्यानंतर भाजपच्या आमदारांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. आता भाजपमधील जुन्यांना मंत्रिपदाची आशा लागली आहे. तर काही नवख्या आमदारांनाही लॉटरी लागेल, असा विश्वास आहे. त्यात भाजपच्या वाट्यातून सोलापूर जिल्ह्याला दोन तर शिवसेनेच्या (बंडखोर गट) कोट्यातून एक मंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा आहे.
हेही वाचा: नव्या सरकारमध्ये CM फडणवीस तर एकनाथ शिंदे अर्थमंत्री? बंडखोरांतील २० जण होतील मंत्री
स्वबळावर सत्ता आणण्याचाच राहणार प्रयत्न
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर राज्याची सत्ता मिळावी, यादृष्टीने भाजपचा प्रयत्न राहणार हे निश्चित. सोलापूर जिल्हा कधी काँग्रेसचा तर कधी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला. शिवसेनेचेही ऐकेकाळी बरेच आमदार होते. पण, भाजपला पहिल्यांदाच २०१९ च्या निवडणुकीत मोठे यश मिळाले. आता आमदारांची संख्या प्रत्येक जिल्ह्यात वाढावी, त्यासाठी कोणता आमदार लाभदायी ठरू शकतो, अशांना मंत्रिपदे मिळतील, असेच चित्र आहे.
हेही वाचा: ‘ईडी’च्या धास्तीनेच राजकीय उलथापालथ! दोन मंत्री तुरुंगात, राहुल गांधीही सुटले नसल्याची भीती
तानाजी सावंत, राजेंद्र राऊत, संजय शिंदेंचीही चर्चा
राज्यात आता एकनाथ शिंदे गटाच्या पाठिंब्याने भाजप सरकार स्थापन करेल, अशी सद्यस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार हे तीन-चार दिवसांत स्पष्ट होऊ शकते. तत्पूर्वी, मागच्या सत्ता काळात कॅबिनेट मंत्री राहिलेल्या सुभाष देशमुख यांना पुढची अडीच वर्षे थांबावे लागण्याची शक्यता आहे. माजी मंत्री तानाजी सावंत, बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी फडणवीसांसोबत पक्षविरहित मैत्री जपल्याने त्यांनाही लॉटरी लागू शकते, असेही बोलले जात आहे. विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचीदेखील चर्चा आहे.
Web Title: Three Mlas From The District Will Get Ministerial Posts The Names Of These Mlas Are Under
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..