आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात पोलिस उपअधीक्षक झालेल्या तृप्ती जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृप्ती जाधव

आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात पोलिस उपअधीक्षक झालेल्या तृप्ती जाधव

उपळाई बुद्रूक : जीवनात कधी हताश, उदास, निराश न होता समोर चालत राहणे हा आयुष्याचा नियम आहे. आणि जो या नियमांचं पालन करत आयुष्य जगतो त्याला जीवनात कमी प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. याची प्रचिती लाडोळे, वैराग (ता.बार्शी) येथील तृप्ती अर्जुन जाधव यांच्या यशातुन दिसून येते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना, स्वतःची स्पर्धा स्वतःशीच करत. आई-वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचा विश्वास सार्थकी लावत. योग्य व काटेकोरपणे नियोजन करत. स्पर्धा परीक्षेला सामोरे जात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून दुसऱ्या प्रयत्नात पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

पोलीस उपअधीक्षक तृप्ती जाधव याबाबत सांगतात की, आई गृहिणी तर वडील शिक्षक होते. घरची परिस्थिती चांगली होती. घरात शैक्षणिक वातावरण असल्याने, शिक्षणाचे महत्व वडिलांकडूनच चांगलेच समजले. प्राथमिक शिक्षण सोलापूर तर माध्यमिक व बारावीचे शिक्षण वैराग येथील विद्या मंदिर महाविद्यालयातून झाले. आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने, लहानपणापासून जे जे हवं ते ते मिळत गेलं. मुलगी असली तरी आई-वडिलांनी एखाद्या मुलाप्रमाणेच सांभाळ केला. स्वतःचे निर्णय घेण्यास पूर्णपणे त्यांच्याकडून स्वातंत्र्य होते. आई-वडिलांचे वैयक्तिक लक्ष देखील असल्याने जडणघडण चांगली झाली. त्याचा फायदा असा झाला की, शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्याकडून कोणतीही उणीव भासली नाही. त्यामुळे माझी गुणवत्तेची क्षमता वाढतच राहिली.

बारावीनंतर बीटेकसाठी पुणे गाठले. बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांचे ध्येय पक्के झालेले असते. परंतु मला आयुष्यात नेमके करायचे काय हे बीटेक शिक्षण घेईपर्यंत नक्की नव्हते. शिक्षणात हुशार आहे, आई-वडील पैसे पुरवतात, त्यामुळे चांगले गुणांनी शिक्षण घ्यायच एवढंच माहित. पुण्यातील महाविद्यालयीन वातावरणात असताना स्पर्धा परीक्षाबद्दल माहिती मिळाली. त्यामुळे मैत्रिणींबरोबर अधून मधून स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे व्याख्याने ऐकण्यासाठी जात असायचे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेबद्दल चांगलेच आकर्षण निर्माण झाले. आईवडिलांचा कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा होता. स्पर्धा परीक्षेबद्दल अंतर्मनातून आवड निर्माण झाली. आपण हे करू शकतो असा एक आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे बीटेक पूर्ण झाल्यानंतर, 'एमटेक की स्पर्धा परीक्षा' असे पर्याय उपलब्ध असताना. स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला.

लहानपणापासून आईवडिलांची शिकवण होती की, एखाद्या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर त्यातून माघार घ्यायची नाही. अन् हे मनावर चांगलेच बिंबवले असल्याने, 'प्रशासकीय अधिकारी व्हायच' हा निश्चय मनाशी बाळगून अभ्यासाला सुरुवात केली. या वयात शक्यतो आई वडील मुलीच्या लग्नाचा विचार करतात. परंतु माझ्या आई-वडीलांनी याबाबत कधीही हट्ट धरला नाही. याउलट शिक्षणासाठी कायमस्वरूपी प्रोत्साहन देत राहिले. त्यांचा पाठिंबाच हा आयुष्यातील पुढील वाटचाल करण्यासाठी बळ देणारा होता. जिद्द, चिकाटी व त्याला आत्मविश्वासाची जोड या त्रिसूत्रीचा अवलंब करत अभ्यास सुरू केला.

अभ्यासाची पुर्णपणे तयारी झाल्यानंतर यशस्वी होणाराच हे डोळ्यासमोर ठेवून परिक्षेस सामोरे गेले. पहिल्याच प्रयत्नात पूर्व, मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत मुलाखतीपर्यंत मजल मारली. परंतु अंतिम यादीत नाव आले नाही. एवढे प्रयत्न करूनही अयशस्वी झाल्याने, त्यामुळे थोडे खच्चीकरण झाले. परंतु अपयश हि यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. याकाळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध परिक्षांमध्ये मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. त्याचबरोबर दुसऱ्या प्रयत्नात राज्यसेवेतून पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली. या यशात आई-वडिलांचा मोठा वाटा असुन, सध्या नागपूर येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहे.

Web Title: Trupti Jadhav Deputy Superintendent Of Police Support Parents

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top